Breaking News

मांग-गारुडी समाजातील चिमुकल्यांसोबत नागपूर सिटिझन्स फोरमची अनोखी दिवाळी

नागपुर :- एक पणती माणुसकीची, तुमच्या आमच्या आपुलकीची असा संदेश देत नागपूर सिटिझन्स फोरमने मांग गारुडी समाजातील चिमुकल्यांसोबत अनोखी दिवाळी साजरी केली. नगरसेवक नागेश मानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्याच निवासस्थानी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कथा आणि गोष्टींच्या माध्यमातून या मुलांना दिवाळीचे महत्व सांगण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी सामुहीक गीत, नृत्य व कोरोनावर आधारीत पथनाट्याचे सादरीकरण केले. फोरमच्या सदस्यांनी पणत्या, दिवे व फुलझड्या प्रज्वलित करुन या चिमुकल्यांसह दिवाळी साजरी केली. यावेळी मुलांना दिवाळीच्या फराळासह, वह्या, पुस्तके, पेन हे शैक्षणिक साहित्य तर थंडीपासून बचावासाठी ब्लॅंकेट टीशर्ट व टोप्या वितरीत करण्यात आल्या.

यावेळी या उपक्रमाचे संयोजक अभिजित सिंह चंदेल, फोरमचे सदस्य अमित बांदूरकर, गजेंद्र सिंह लोहिया , प्रतिक बैरागी, वैभव शिंदे पाटील, प्रा. विकास चेडगे, श्रिया ठाकरे, शशांक गट्टेवार, निक्कू हिंदुस्थानी, श्री तिवारी व पोटे आदी सदस्य उपस्थित होते.

हा उपक्रम म्हणजे मुख्य प्रवाहापासून दूर असणार्‍या समाजाची वेदना काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न होता. या निमित्ताने या मुलांच्या निरागस चेहर्‍यावरचा आनंद पाहून त्यांना पुढे आणण्यासाठी काही तरी करावे अशी प्रेरणा मिळाल्याचे या उपक्रमाचे संयोजक अभिजित सिंह चंदेल म्हणाले आहेत.

नागपुरातील रामटेके नगर (टोली) परिसरात मोठ्या संख्येत मांग-गारुडी समाजाचे वास्तव्य आहे. वर्षानुवर्षांपासून उपेक्षेचे जीवन जगणार्‍या या लोकांच्या वाटेला आनंदाचे मोजकेच क्षण येतात. अवैध दारु विक्री, कचरा वेचणे हाच या समाजातील अनेकांचा व्यवसाय आहे. चोरीचा कलंक माथी असल्याने यांना कुणीही कामावर ठेवत नाही. समाजाकडून यांना कायम उपेक्षा पदरी पडते त्यामुळे हे लोक मुख्य प्रवाहापासून दूर लोटल्या गेले.

या वस्तीतील अनेक घरांमधील पुरुष हे व्यसनाच्या आहारी गेल्याने महिलांना मुला बाळांना जगवण्यासाठी पायपीट करावी लागते. परिणामी मुलांच्या शिक्षणावर दुर्लक्ष होते. शिक्षणासाठी आवश्यक वातावरण नसल्यामुळे आजवर इथल्या अनेक पिढ्या बर्बाद झाल्या आहेत.

या अंधारातही खुशाल ढाक नावाचा तरुण पणती घेऊन या वंचितांच्या आयुष्यात प्रकाश पेरण्याचे काम करतोय. खुशाल गेल्या 16 वर्षांपासून या परिसरात कार्यरत आहे. सेवासर्वदा या संस्थेच्या माध्यमातून 3 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी तो सातत्याने धडपडत असतो. या मुलांच्या शिक्षणापासून त्यांच्यात संस्काराचे बीज रुजविण्यापर्यंतचे काम तो मोठ्या हिमतीने पुढे नेत आहे. इतर मुलांसारखीच या मुलांची बुद्धी तल्लख आहे. साधनांच्या अभावामुळे ते स्पर्धेत माघारले आहेत. त्यांना योग्य सोयी सुविधा मिळाल्या तर ते नक्कीच गुणवंत ठरतील असा विश्वास खुशालला वाटतो. इथल्या मुलांना या वातावरणातून बाहेर काढल्याशिवाय त्यांचा आयुष्याला दीशा मिळणार नाही हे तो ठामपणे सांगतो.* या मुलांसाठी खरेच काही करायचे असेल तर सरकार व समाजातील दानशूरांनी या मुलांसाठी उभ्या होणार्‍या शाळेसाठी मदत करावी असे आवाहन खुशालने केले आहे. विशेष म्हणजे खुशालच्या आईने या मुलांच्या निवासी शाळेसाठी कालडोंगरी येथे आपल्या शेतातील दोन एकर जागा दान दिली आहे. या जागेवर मुलांसाठी शाळा उभी करावी हे खुशालचे स्वप्न आहे.

खुशाल ढाक यांच्या जिद्दीला सलाम करत नागपूर सिटिझन्स फोरमने त्यांचे हे कार्य अधिक जोमाने पुढे नेण्याचा संकल्प केला. येत्या काळात फोरमच्या माध्यमातून या भागातील विद्यार्थ्यांसाठी ठोस व व्यापक कार्यक्रम हाती घेणार असल्याचे फोरमच्या वतीने सांगण्यात आले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या बसचा समृद्धी महामार्गावर भिषण अपघात, २५ प्रवाशांचा मृत्यू

नागपूर / बुलढाणा :- समृद्धी महामार्गावरुन नागपूरहून पुण्याला जाणारी बसचा बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ …

राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर विमानतळावर स्वागत 

नागपूर दि.२३ : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर विमानतळावर शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता आगमन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved