• फक्त दोन ओळखपत्राला मान्यता
• सकाळी 8 ते 4 मतदानाची वेळ
• एकूण 15 केंद्र ; 559 मतदार
• पसंतीक्रमाने होणार मतदान
• रिंगणात एकूण ३ उमेदवार
• कोविड प्रोटोकॉल अनिवार्य
• 14 डिसेंबरला मतमोजणी
नागपूर दि. 8 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदार संघ निवडणुकीसाठी उद्या शुक्रवारी 10 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. एकूण 559 मतदार असून तीन उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विमला आर. यांनी आज निवडणूक यंत्रणेचा आढावा घेतला. सायंकाळी पत्रकार परिषदेत प्रशासन निवडणूक प्रक्रियेसाठी सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
559 मतदार ; 15 मतदान केंद्र या निवडणुकीमध्ये एकूण मतदारांची संख्या 559 आहे. यामध्ये महानगरपालिका 155 जिल्हा परिषद 70 व नगरपरिषद आणि नगरपंचायत 334 अशी मतदार संख्या आहे. नागपूर शहरातील तीन मतदान केंद्र व ग्रामीण भागातील 12 अशा एकूण 15 केंद्रांवर मतदान होणार आहे. मतदानाची वेळ सकाळी 8 ते 4 असणार आहे.
दोनच ओळखपत्र ग्राहय मतदानाला येताना मतदाराला आपल्यासोबत भारत निवडणूक आयोग यांनी निर्गमित केलेले मतदार छायाचित्र ओळखपत्र किंवा मतदार ज्या स्थानिक प्राधिकारी संस्थेचा सदस्य असेल त्या स्थानिक प्राधिकारी संस्थेने निर्गमित केलेले ओळखपत्र अनिवार्य आहे. याशिवाय अन्य कोणताही पुरावा ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरला जाणार नाही.
*पसंतीक्रम आवश्यक*
मतदान करताना मतपत्रिकेवर पसंतीक्रम नोंदविणे आवश्यक आहे. १,२,३ किंवा 1,2,3 किंवा I,॥, III अशा आकड्यांमध्ये आपला पसंती क्रमांक दर्शविणे आवश्यक आहे. शब्दांमध्ये पसंती क्रमांक नोंदविता येणार नाही. मतदान केंद्रांमध्ये मोबाईल, स्पाय कॅमेरा, स्पाय पेन, कॅमेरा, टॅब, तसेच कोणतेही इलेक्ट्रॉनिक साधन घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. एकूण 15 मतदान पथके यासाठी कार्य करणार आहे.
*येथे होणार मतदान*
नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदार संघात नागपूर महानगर पालिकेच्या नगरसेवकांना मतदान करण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय बाजुला तहसील कार्यालय नागपूर शहर खोली क्रमांक 2, तहसीलदार कार्यालय तहसील कार्यालय नागपूर शहर खोली क्रमांक 4 या ठिकाणी मतदान केंद्र उपलब्ध करण्यात आले आहे.
जिल्हापरिषदेच्या सदस्यांसाठी नागपूर ग्रामीण येथील तहसील कार्यालय खोली क्रमांक 1, मध्ये (आमदार निवास परिसर) मतदान करता येणार आहे. अन्य मतदान ग्रामीण भागात आहे. यामध्ये नगरपरिषद नरखेड येथील नगरसेवकांसाठी तहसील कार्यालय नरखेड खोली क्रमांक 1, नगर परिषद काटोल येथील नगरसेवकांसाठी तहसील कार्यालय काटोल खोली क्रमांक 1, नगर परिषद सावनेर व नगरपरिषद खापा येथील नगरसेवकांसाठी तहसील कार्यालय सावनेर खोली क्रमांक 1, नगरपरिषद रामटेक येथील सर्व नगरसेवकांसाठी तहसील कार्यालय रामटेक खोली क्रमांक 1, नगर परिषद कामठी नगर पंचायत महादुला येथील नगरसेवकांसाठी तहसील कार्यालय कामठी खोली क्रमांक 1, नगर परिषद कळमेश्वर ब्राह्मणी व नगरपरिषद मोहपा येथील नगरसेवकांसाठी तहसील कार्यालय कळमेश्वर खोली क्रमांक 1, नगर परिषद उमरेड येथील नगरसेवकांसाठी तहसील कार्यालय उमरेड खोली क्रमांक 1 नगर परिषद कन्हान पिंपरी येथील नगरसेवकांसाठी नगर परिषद कार्यालय कन्हान पिंपरी खोली क्रमांक 1, नगरपंचायत मौदा येथील नगरसेवकांसाठी तहसील कार्यालय मौदा खोली क्रमांक 1 नगर परिषद बुटीबोरी येथील नगरसेवकांसाठी नगरपरिषद कार्यालय बुटीबोरी खोली क्रमांक 1, नगरपंचायत पारशिवनी येथील नगरसेवकांसाठी तहसील कार्यालय पारशिवणी खोली क्रमांक 1, नगर परिषद वानाडोंगरी येथील नगरसेवकांसाठी नगरपरिषद कार्यालय वानाडोंगरी खोली क्रमांक 1 या ठिकाणी सुविधा देण्यात आली आहे.
*मतमोजणी बचत भवनात*
बचत भवन येथे मतमोजणी होणार आहे. 10 ते 14 मतपेट्या बचत भवन येथील स्टॉंगरूम मध्ये ठेवण्यात येतील. आज पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बचत भवन परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पाहणी केली. या परिसरात उद्या 144 कलम लागू होईल. याच ठिकाणी 14 तारखेला मतमोजणी होणार आहे. सकाळी 8 ते प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत 4 टेबलवर मतमोजणी चालेल.
*उमेदवार एकूण तीन*
या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार चंद्रशेखर कृष्णरावजी बावनकुळे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार रवींद्र प्रभाकर भोयर, अपक्ष उमेदवार मंगेश सुधाकर देशमुख असे तीन उमेदवार रिंगणात आहेत. उदया 10 डिसेंबरला मतदान व 14 डिसेंबरला स्थानिक प्राधिकारी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
*तालुक्याचे सेतू केंद्र बंद*
सर्व मतदान केंद्र तहसील कार्यालयाच्या आसपास असल्यामुळे मतदानाच्या दिवशी 10 डिसेंबरला तहसील कार्यालय नागपूर शहर, नागपूर ग्रामीण तहसील कार्यालय, तहसील कार्यालय नरखेड, काटोल, रामटेक, उमरेड, मौदा, पारशिवनी, येथील सेतू केंद्र बंद ठेवली जाणार आहेत. मतदानाच्या दिवशी धारा 144 लागू असल्यामुळे मतदान केंद्राच्या दोनशे मीटर परिसरात इतर लोकांना मज्जाव करण्यात आला आहे.नागरिकांनी या प्रक्रियेत सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
*कोविड प्रोटोकॉल अनिवार्य*
या निवडणुकीमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रत्येक मतदान केंद्रासाठी करण्यात आलेल्या आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर थर्मल स्कॅनिंग केले जाणार फार्मर स्कॅनर मध्ये शरीराचे तापमान सामान्य तापमानापेक्षा जास्त आढळल्यास अशा मतदारांना शेवटच्या एका तासामध्ये मतदान करता येणार आहे. सर्व केंद्रावर सॅनिटायझर थर्मल स्कॅनिंगची व्यवस्था करण्यात आली आहे.