Breaking News

दिव्यांगांच्या चेहऱ्यावर आनंद झळकविण्यासाठी कटिबद्ध – ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू

दिव्यांगांच्या दारी अभियानाला उत्स्फुर्त प्रतिसाद

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर 

चंद्रपूर, दि. 26 : संपूर्ण देशात केवळ महाराष्ट्र सरकारने दिव्यांग मंत्रालय स्थापन केले आहे. अनेक आंदोलनातून हे मंत्रालय स्थापन करता आले, याचा अभिमान आहे. केवळ पाच महिन्यात दिव्यांग बांधवांच्या दारी हे मंत्रालय आले असून दिव्यांगांच्या चेह-यावर आनंद झळकविण्यासाठी आपण नेहमीच कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू (मंत्री दर्जा) यांनी दिली.

शकुंतला लॉन येथे दिव्यांग कल्याण विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित ‘दिव्यांगांच्या दारी अभियानात’ मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुरेश पेंदाम, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब देशमुख आदी उपस्थित होते.

 

दिव्यांगांचे अनेक प्रश्न आणि दु:ख आहे, असे सांगून आ. बच्चू कडू म्हणाले, या कार्यक्रमाचे जिल्हा प्रशासनाने उत्तम नियोजन केले आहे. मात्र ऐवढ्यावरच न थांबता जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांग लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी प्रामाणिकपणे काम करावे. दिव्यांग बांधवांसाठी आपण अनेक आंदोलने केली. याच आंदोलनातून हे मंत्रालय उभे राहिले आहे. शेवटच्या श्वासापर्यंत आपण दिव्यांगांसाठी लढत राहणार आहोत. दिव्यांगांच्या घरापर्यंत योजना कशा पोहचविता येतील, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुढे श्री. कडू म्हणाले, घरकूल, अंत्योदय, शौचालय या योजनांसोबतच येत्या दोन-तीन महिन्यात दिव्यांगांसाठी चांगल्या योजना आणल्या जातील. ग्रामीण स्तरावर काम करणारे ग्रामसेवक, कोतवाल, तलाठी, कृषी सहाय्यक, रोजगार सहाय्यक आदींनी या योजनांबाबत दिव्यांग बांधवांना अवगत करावे. केवळ शासन निर्णय म्हणून नाही तर कर्तव्य म्हणून काम करा. दिव्यांग तसेच निराधारांना 1500 रुपये महिना दिला जातो. मात्र कधीकधी चार-चार महिने पैसे मिळत नाही, ही शोकांतिका आहे. त्यामुळे महिन्याच्या 5 तारखेपर्यंत संबंधितांच्या खात्यात रक्कम जमा करावी, याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दिव्यांग मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी चंद्रपूर जिल्हा परिषदेने विशेष अभियान राबविले आहे, हे नक्कीच कौतुकास्पद आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जॉन्सन आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदनही यावेळी बच्चू कडू यांनी केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जॉन्सन म्हणाले, विविध योजनांचा लाभ, प्रमाणपत्रे यासाठी दिव्यांगांना फिरावे लागते. सर्व लाभ एकत्र देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकसंख्येच्या सरासरी तीन ते पाच टक्के दिव्यांग असतात. आपल्या जिल्ह्यात दिव्यांगांची नोंदणी कमी आहे, त्यामुळे त्यांना शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागते. मात्र जिल्हा परिषदेमार्फत विशेष मोहीम राबवून दिव्यांगाची नोंदणी केली जाईल. दिव्यांग विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून जिल्हा परिषदेने शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी तपासणी मोहीम हाती घेतली आहे. राज्यात हा अभिनव प्रयोग फक्त चंद्रपूर जिल्ह्यानेच केला असल्याचे  जॉन्सन यांनी सांगितले.

प्रास्ताविकात डॉ. सुभाष पवार म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यात जवळपास 13 हजार दिव्यांगांची नोंदणी आहे. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर पालिका प्रशासन, सामाजिक न्याय, समाजकल्याण विभाग तसेच विविध विभागांमार्फत दिव्यांगांसाठी अनेक योजना राबविल्या जातात व लाभसुध्दा दिला जातो. जिल्ह्यात दिव्यांगांसाठी 12 शाळा असून त्यात 650 विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहे. तसेच येथे दिव्यांग पुनर्वसन केंद्र कार्यरत असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते दिव्यांग लाभार्थी सिध्दार्थ टिपले यांना झेरॉक्स मशीन, सुनील गांगरेड्डीवार यांना मोटरपंप, फरान शेख, अर्णव अलोणे यांना व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले. तसेच दिव्यांग उद्योजकांचा सत्कारसुध्दा करण्यात आला. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते दिव्यांगासाठी असलेल्या योजनांच्या माहिती पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. तसेच येथे लावण्यात आलेल्या विविध स्टॉलची बच्चू कडू यांनी पाहणी केली.

कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून ब्रेल लिपीचे जनक ग्रॅहम बेल आणि डॉ. हेलन केलर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी आनंदवन वरोरा येथील संधी निकेतन अपंगांची शाळा येथील दिव्यांग विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे, कपिलनाथ कलोडे, जिल्हा पुरवठा अधिकारी अजय चरडे, सहाय्यक पांडूरंग माचेवाड यांच्यासह दिव्यांग प्रतिनिधी नीलेश पाझारे व इतर बांधव उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

अनोळखी मृतकाची ओळख पटविण्याकरीता संपर्क करण्याचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 2 : दिनांक 31 मार्च 2024 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय, …

जिल्ह्यात कामगारांचे कैवारी अवतरले – जिल्हा पोलीस अधिक्षक लोहित मतानी

जागतिक कामगार दिनानिमित्त कामगारांचा सत्कार थाटात जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हान मो.9665175674 (भंडारा):- पावसाळा, हिवाळी व उन्हाळा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved