नागपूर, दि. 8 : भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यामध्ये 9 मे रोजी वादळीवारा, वीज, गारपीट व हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली असून या कालावधीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर 10 ते 12 मे या कालावधीकरीता येलो अलर्ट दिलेला असून या दिवशी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह वादळीवारा व वीज गर्जनेची शक्यता वर्तवलेली आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
वीज गर्जना होत असताना शक्यतो घरातच राहणे आवश्यक आहे. अशा कालावधीमध्ये मोबाईल फोन सोबत बाळगू नये. वीज गर्जना सुरू असताना घरातील इलेक्ट्रिकल उपकरणे बंद ठेवावी. पाऊस व वीज गर्जना होत असताना चुकूनही झाडाच्या खाली उभे राहू नये व शेतात काम करत असताना सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. जिल्ह्यातील समस्त नागरिकांना व शेतकऱ्यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी शासनाच्या सर्व सूचनांचे पालन करावे व स्वसंरक्षणासाठी सतर्क राहावे, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे कळविण्यात आले आहे.