जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर, दि. 18 : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान जनजागृतीसाठी जिल्हा प्रशासनातर्फे स्वीप अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून लोकशाही प्रक्रियेत आपला सहभाग वाढवावा, या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज (दि. 18) चार हजार विद्यार्थ्यांच्या मानवीय साखळीतून मतदार जनजागृतीचा संदेश दिला.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, चंद्रपूर द्वारा विधानसभा निवडणूक – 2024 स्वीप कार्यक्रमाअंतर्गत मतदार जनजागृती मानवीय साखळीचे आयोजन शहरातील भवानजी भाई चव्हाण हायस्कूल चंद्रपूर येथे करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजय पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (मनरेगा) श्री. कुतीरकर, तहसीलदार विजय पवार, शिक्षणाधिकारी (माध्य.) राजेश पातळे, अश्विनी सोनवणे (प्राथ.), उपशिक्षणाधिकारी विशाल देशमुख, निवास कांबळे यांच्या उपस्थितीत चार हजार विद्यार्थी, शिक्षक यांनी जवळपास तीन किलोमीटर मानवीय साखळी तयार केली.
यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आपण सर्वांनी जनजागृती करावी, असे आवाहन केले. सोबतच 20 नोव्हेंबर मतदानाच्या दिवशी मतदान केल्यानंतर आपली सेल्फी दिलेल्या लिंक वर अपलोड करून आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी आहे, असेही सांगितले.
या मानवीय साखळी मध्ये ज्युबली हायस्कूल, मातोश्री विद्यालय, भवानजी भाई चव्हाण हायस्कूल, माऊंट कार्मील कॉन्व्हेन्ट, विर शहीद भगतसिंग हायस्कूल, रवींद्र उच्च प्राथमिक शाळा, हिंदी माध्यमिक स्कूल, चंद्रपूर पब्लिक स्कूल, राजीव गांधी महाविद्यालय, बाबुराव वानखेडे या शाळांचे विद्यार्थी सहभागी झाली होते. सोबतच जिल्हा परिषद, महानगरपालिकेचे शिक्षकांनी जिल्हा प्रशासनामार्फत दिलेल्या टी शर्ट, टोपी परिधान करून सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे संचालन अविनाश जुमडे यांनी तर आभार विस्तार अधिकारी धनपाल फटिंग शिक्षण यांनी मानले. कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी निवास कांबळे, प्रशासन अधिकारी नीत सर, निखिल तांबोळी, अविनाश जुमडे, अतुल पोहणे, प्रकाश झाडे, सुरेंद्र शेंडे, प्रशांत मत्ते, श्री. आत्राम, श्री. गेडाम, श्री. कोवे यांच्यासह मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी उपस्थित होते.