जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर दि.15 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रमादरम्यान चंद्रपूर जिल्ह्यात विविध राजकीय पक्षांच्या अतिमहत्वाच्या व्यक्तींचे प्रचारासाठी दौरे होत आहेत. त्यांच्याद्वारे घेण्यात येणाऱ्या सभेत मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असते. या गर्दीचा फायदा घेऊन समाज विघातक घटकांद्वारे पाण्याची बाटली अथवा तत्सम वस्तु फेकुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने, अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्याप्रसंगी सभास्थळी पाण्याची बाटली तसेच ज्या वस्तु फेकुन मारल्या जाऊ शकतात, त्यांना जवळ बाळगण्यास मनाई असल्याचा प्रतिबंधात्मक आदेश भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-2023 चे कलम 163 (1) अन्वये पोलीस विभागातर्फे निर्गमित करण्यात आला आहे.
निवडणूक प्रचारासाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा 16 नोव्हेंबर रोजी चिमूर येथे प्रचार दौरा असून इतर अतिमहत्वाच्या व्यक्तींचा दौराही येत्या काही दिवसात होण्याची शक्यता आहे. प्रचार दौरा दरम्यान होणाऱ्या सभेस मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता असते. यापूर्वीही अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यावेळी मोठ्या संख्येने नागरीकांची गर्दी जमली होती. अशा प्रसंगी जवळ बाळगलेले साहित्य फेकून कार्यक्रमामध्ये अडथळा निर्माण केला जाऊ शकतो व पर्यायाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नसुद्धा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 08 ते रात्री 10 वाजेपर्यंत कोणतेही नागरिक, बॉटल व ज्या वस्तू फेकून मारल्या जावू शकतात, असे कोणत्याही प्रकारचे साहित्य जवळ बाळगू शकणार नसल्याची माहिती पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिली आहे.