
पालकमंत्र्यांकडून प्रशासन, पोलीस, आरोग्य यंत्रणेचा विस्तृत आढावा
• बेड मॅनेजमेंटची जबाबदारी आयएएस अधिकाऱ्यांना
• ऑक्सिजन उपलब्धता व व्यवस्थापनासाठी नोडल अधिकारी
• पोलिसांसाठी प्रत्येक हॉस्पिटलला बेड आरक्षित करण्याचे निर्देश
• दर्जेदार पीपीई व अन्य प्रतिबंधात्मक साहित्य उपलब्ध करा
• प्रशासन, पोलीस, मनपा व आरोग्य यंत्रणेतील समन्वय वाढवा
• खासगी हॉस्पिटलला सुलभ औषध पुरवठा करा
• निवृत्त डॉक्टरांकडून नागपूरकरांना ऑनलाईन मार्गदर्शन होणार
• अन्य जिल्हयातून येणाऱ्या रुग्णासाठी उपचार नियोजन करावे
नागपूर दि. ११ : नागपूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या पुढील काही दिवसात आणखी वाढण्याची वैद्यकीय सुत्रांची शक्यता आहे. त्यामुळे शहराच्या व जिल्ह्याच्या आरोग्याच्या दृष्टीने आणीबाणीच्या परिस्थितीत सर्वोच्च आरोग्य सुविधा देण्याची जबाबदारी आमची सर्वांची आहे. त्यासाठी प्रशासन, पोलीस, आरोग्य, महापालिका या सर्व यंत्रणांनी नियोजन पूर्वक एकछत्री अमलात जबाबदारीने काम करण्याचे निर्देश राज्याचे ऊर्जा मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज दिले.
मुंबई येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी आज दोन सविस्तर बैठकी घेतल्या. पहिली बैठक महानगरपालिका व पोलीस प्रशासन यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची झाली. या बैठकीमध्ये महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. व पोलीस आयुक्त अमितेशकुमार व अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी सहभागी झाले होते. या बैठकीमध्ये प्रामुख्याने गर्दीवर नियंत्रण करून संसर्ग पसरण्यापासून रोखण्याचे आवाहन करण्यात आले.
कोरोनावर मात करण्यासाठी एस.एम.एस.(सोशल डिस्टंसिंग, मास्क आणि सॅनीटायझर) हे प्रभावी उपाय आहेत. कोरोनाची साखळी तोडायची असेल तर किमान १४ दिवस लॉकडाऊन लावावा लागेल. मात्र लॉकडाऊन केल्यास गोर-गरीब, निराधार, छोटे दुकानदार, फुटपाथ विक्रेते, बेरोजगार इत्यादी घटकांचे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होतात. उद्योगांवर देखील विपरीत परिणाम होईल. मात्र परिस्थिती अशीच गंभीर राहिल्यास काही दिवस लॉक डाऊन करण्याबाबतचा विचार करता येईल का? या संदर्भातही त्यांनी यावेळी चर्चा केली.
गर्दीवरील नियंत्रणाबाबत पालकमंत्र्यांनी सर्वाधिक चिंता व्यक्त केली. अत्यावश्यक कारणाशिवाय नागरिकांनी घराबाहेर निघू नये. शक्यतो ऑनलाईन पद्धतीने खरेदीचे धोरण स्वीकारायला हवे. बाहेरून आपल्या घरात येणारा व्यक्ती कोरोना घेऊन येऊ शकतो. त्यामुळे सतर्क राहण्यासाठी नागरिकांची मानसिकता तयार करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यासाठी सर्व स्तरावरून मोठ्या प्रमाणात प्रचार, प्रसार यंत्रणा राबविण्याबाबत त्यांनी निर्देशित केले. माध्यमांनी देखील या जनजागृतीमध्ये सहभागी होणे. गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलीस स्टेशन निहाय “कोरोना सुरक्षा समिती” स्थापन करणे, लोकसहभागातून जनतेला आवाहन करणे, गर्दी व्यवस्थापन करण्यासाठी पोलीस विभागाने एस.ओ.पी. तयार करून त्याची ताबडतोब अंमलबजावणी करावी, गस्त, बंदोबस्त, वाहनातून आवाहन, वाहतूक व्यवस्थेत बदल करून गर्दी नियंत्रणात आणून कोरोनाचा वाढता प्रसार थांबवावा. पोलीस विभागाने जनजागृती करून गर्दीवर नियंत्रण आणावे, असे आवाहनही त्यांनी केले.
अमितेश कुमार यांनी पोलिसांच्या सुरक्षा संदर्भातील प्रश्न यावेळी उपस्थित केल्यावर पालकमंत्री राऊत यांनी तातडीने यासंदर्भात व्यवस्था करण्यात येईल, असे स्पष्ट केले. तसेच त्यानंतरच्या बैठकीत सर्व वैद्यकीय आस्थापनांना पोलिसांसाठी बेड राखीव ठेवण्याचे त्यांनी निर्देशित केले.सोबतच पोलिसांना ऑक्सीमिटर, थर्मल स्कॅनर, औषधे अन्य वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्याचे देखील त्यांनी निर्देश दिले.
डॉ.राऊत यांनी दुसरी बैठक विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे त्यांच्यासह अधिनस्त अधिकारी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत घेतली.
सामान्य माणसाला कोरोना आजाराला सामोरे जाताना रुग्णालयातून परत जावे लागणे किंवा बेड नाही हे सांगितले जाणे, हे निश्चितच योग्य नाही. त्यामुळे बेड मॅनेजमेंटसाठी लक्ष घाला असे निर्देश त्यांनी दिले. यासाठी मेयोमध्ये मीताली सेठी आणि मेडिकलमध्ये भाग्यश्री सातपुते या आयएएस अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. हे अधिकारी बेड मॅनेजमेंटकडे व रुग्णालय प्रशासनाकडे लक्ष देतील. तसेच वैद्यकीय उपचार व अन्य बाबींकडे संबंधित रुग्णालयाच्या अधिष्ठातांनी लक्ष घालावे, असे निर्देश त्यांनी दिले. दोन्ही सनदी अधिकाऱ्यांचे व्यवस्थापनाबद्दलचे अभिप्राय जाणून घेतले. यावेळी विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार यांनी काही उपाययोजना सूचवल्या. यामध्ये अमरावती, अकोला, चंद्रपूर व अन्य ठिकाणावरून येणाऱ्या बाधितांची संख्या वाढत असून येणाऱ्या काळात नियोजन करताना या बाबीकडे लक्ष देण्याचे देखील सांगितले. कंत्राटी पद्धतीने काही मनुष्यबळ उपलब्ध केले जात असून त्यासाठी युध्दस्तरीय प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले.
मुंबई महापालिकेचे आयुक्त आय.एस. चहल यांनी दिलेल्या सूचनांचे देखील पालन करण्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. बेडच्या उपलब्धते संदर्भात डिजिटल डिस्प्ले तयार करण्याचे त्यांनी निर्देश दिले. अतिदक्षता कक्षातील बेडची संख्या वाढविण्यात यावी.पदव्युत्तर वैद्यकीय प्रशिक्षण पूर्ण केलेल्या डॉक्टरांची सेवा अधिग्रहित करण्यात यावी. याशिवाय सीसीटीव्ही कॅमेरावर बाधितांच्या नातेवाईकांना रुग्णांना पाहण्याची सोय करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.
ऑक्सिजनची कमतरता भासू नये,यासाठी ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या सर्व संस्थांना आवश्यक निर्देश द्यावे. तसेच अन्य राज्यातून ऑक्सिजन आयात करण्यासाठी यापुढे सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त मिलिंद साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयाचे काम करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.
पालकमंत्री उद्या नागपूर येथे येत असून वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजनांबाबत खासगी वैद्यकीय प्रॅक्टिशनर, प्रसार माध्यम प्रतिनिधी, ऑक्सिजन सिलिंडर पुरवठादार लोकप्रतिनिधी यांच्यासोबत व्हीडीओ कॉन्फरन्सव्दारे उद्या बोलणार आहेत. खाजगी हॉस्पिटलला देखील उपचार करताना अत्यावश्यक औषधांची कमतरता पडणार नाही. या संदर्भातील उत्तम समन्वय प्रशासन व खाजगी हॉस्पिटल यंत्रणा यांच्यामध्ये ठेवण्याचे निर्देशही त्यांनी आजच्या बैठकीमध्ये दिले.
*****