
ना.राजेश टोपे, ना.अनिल देशमुख,ना. राजेंद्र शिंगणे यांच्याकडून मेडिकल कॉलेजची पाहणी
नागपूर दि २५ . नागपुरातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ( मेडिकल ) कोरोना रूग्णासाठी राखीव खाटांची संख्या वाढविण्यात यावी, सतराशे पैकी एक हजार खाटा फक्त कोवीड रूग्णांच्या उपचारासाठी ठेवण्यात याव्यात, असे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिले.
आज सकाळी साडेदहा वाजता त्यांनी नागपूर येथील शासकीय रुग्णालयातील कोवीड कक्षाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषधी प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार, महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता सजल मित्रा यांची उपस्थिती होती.त्यानंतर त्यांनी मेडिकलच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. नागपूर व विदर्भातील मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण येथे दाखल होतात. त्यांच्यासाठी खाटा उपलब्ध असल्या पाहिजेत. कोणत्याही परिस्थितीत रुग्ण परत जाता कामा नये. तसेच त्याला योग्य ते उपचार मिळाले पाहिजे. त्यासाठी केवळ कोविड समर्पित खाटांची संख्या 1 हजार संख्येपर्यत ‘मेडिकल ‘मध्ये वाढविण्यात यावी, अशी सूचना त्यांनी केली.
साठ वर्षांपेक्षा अधिक वय व श्वसनासंदर्भातील आजार असणारे डॉक्टर वगळता सर्व स्तरातील वैद्यकीर्यांना या काळात आपली सेवा द्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे यापुढे रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांना आठ तासांची शिफ्ट सक्तीची करा तसेच सात दिवसांचा क्वारंटाइन कालावधी देखील कमी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
नागपूर शहर व जिल्ह्यात वाढते रुग्ण लक्षात घेता जिल्ह्यातील खाटांच्या उपलब्धतेबाबतचे डॅशबोर्ड अद्यावत करणे, ऑक्सिजन सपोर्ट बेड वाढविणे, माहिती देणाऱ्या कंट्रोल रूमला अद्यावत करणे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, आरटीपीसीआर चाचण्या वाढवणे, व्हेंटिलेटर पूर्ण क्षमतेने सुरू असणे, रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णाबाबत माहिती मिळण्यासाठी स्क्रीन डिस्प्लेची सुविधा उपलब्ध करणे, महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सर्व ठिकाणी उपचार व्हावेत यासाठी रुग्णालय प्रशासनाने या आणीबाणीच्या काळात पुढे येत सुधारणा करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
अन्न व औषधी प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी रेमडिसीव्हर या औषधांचा तुटवडा भासणार नाही असे आश्वासित केले मात्र गरज नसताना कोरोना आजाराच्या पहिल्या काही दिवसातच याचा वापर करणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले काही ठिकाणी या औषधांचा अनावश्यक वापर होत आहे त्यामुळे औषधांची मागणी वाढत असून या संदर्भात काळाबाजार करणार्यांवर देखील कारवाई केली जाईल ,असे त्यांनी स्पष्ट केले. नागपूर जिल्ह्यामध्ये ऑक्सिजन पुरवठ्याची कमतरता भासणार नाही, यासंदर्भात दररोज नियंत्रण ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले.
विभागीय आयुक्त संजीवकुमार व महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी मेडिकल कॉलेज संदर्भातील मनुष्यबळाचा प्रश्न सोडवावा, तसेच कंत्राटी नेमणुका तातडीने कराव्यात, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
नागपुरातील मृत्यूदर कमी करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उत्तम सुविधा मिळतात. हा विश्वास जागविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सामान्य नागरिकांना डॉक्टरांची अत्यंत आवश्यकता असून वैद्यकीय सेवेत सर्वांनी झोकून देऊन काम करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.