
नागपूर, ता.१५ : नागपूरात पुढील काही दिवस कोरोना रुग्णांची संख्येत वाढ दिसून येणार आहे. त्यामुळे घाबरण्याचे काही कारण नाही, कारण ध्रुव पॅथालॉजी लॅबकडून आता मागील डाटा आई.सी.एम.आर.कडून पोर्टलवर टाकण्यात येत आहे.
मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. जलज शर्मा यांनी सांगितले की, कोव्हीड – १९ ची चाचणी करण्यासाठी मान्यताप्राप्त ध्रुव पॅथालॉजी लेबॉरेटरीकडून चाचणी केलेल्या कोरोना रुग्णांची अद्यावत माहिती आई.सी.एम.आर.च्या पोर्टलवर टाकण्यात आली नव्हती. यासाठी मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. यांनी ध्रुव पॅथालॉजीला पुढील चाचणीसाठी बंदी घातली होती तसेच पाच लाख रुपये दंडही आकारला होता. मनपा आयुक्तांनी आई.सी.एम.आर चे दिशा निर्देशांचे उल्लंघन झाल्यामुळे साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ अंतर्गत कारवाई केली होती.
मनपा आयुक्तांचे निर्देशानंतर ध्रुव पॅथालॉजी कडून आई.सी.एम.आर.ला कोरोना चाचणी संबंधीचा डाटा उपलब्ध करण्यात आला. ही माहिती आई.सी.एम.आर. कडून पुढील काही दिवसात पोर्टल वर टाकण्यात येईल. श्री. जलज शर्मा यांनी सांगितले की मागील डाटा आता अपलोड करण्यात येत असल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्येमध्ये वाढ झाली असे नागरिकांना वाटेल परंतु कोरोना रुग्णांबददल आंकडयामध्ये दुरुस्ती करणे अपेक्षित आहे. पुढील काही दिवस हे काम चालणार आहे, असे ही त्यांनी सांगितले.