जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर तालुक्यातील प्रसिद्ध असा मुक्ताई धबधबा काल पहाटे झालेल्या पावसाने ओसंडून वाहत आहे. व सभोवताल नटलेले हिरवेगार डोंगर व त्यामधून वाहणारा हा धबधबा प्रेक्षकांना भुरळ घालत आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी या धबधब्यावर पाहण्यासाठी व आंघोळ करून मनमुराद आनंद लुटण्यासाठी तुफान गर्दी केली आहे.पावसाळ्याच्या दिवसांमध्ये चिमूर तालुक्यातील डोमा या गावा लगत मुक्ताई देवस्थान असलेल्या व हिरवळीने नटलेल्या डोंगरावरून हा धबधबा वाहत असून जवळपास 20 मीटर उंचावरून पाणी पडत असल्याने प्रेक्षकांसाठी आकर्षणाचा विषय ठरत आहे. या पर्वतावरील हिरवीगार वनराई तसेच पर्वतावरून वाहणारे पाणी याचा आनंद लुटण्यासाठी प्रेक्षकांनी बऱ्याच प्रमाणात गर्दी करायला सुरुवात केली आहे.या ठिकाणी मुक्ताई हे माना समाजाचे आराध्य देवस्थान आहे.
तसेच या देवस्थान मध्ये भक्तगण भक्ती भवानी पूजा अर्चना करतात. हा धबधबा पावसाळ्यामध्ये सुरू होत असून पावसाळ्यात या ठिकाणी दूरवरून अनेक जिल्ह्यातून पाहण्यासाठी दरवर्षी पुरुष, महिला, शालेय विद्यार्थी, युवक,, युवती येत असतात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हा धबधबा दोन ते तीन महिने ओसंडून वाहत असतो. त्यामुळे हा धबधबा पाहण्यासाठी दूरवरून महिला पुरुष शालेय विद्यार्थी जेवणाचे डबे घेऊन तर कोणी स्वयंपाकाचे साहित्य घेऊन या ठिकाणी पार्ट्या करतात.
हा धबधबा पाहण्यासाठी मुख्यता दर रविवारी शेकडोच्या संख्येने प्रेक्षकांची खूप गर्दी असते. आणि 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी या ठिकाणी हजारोच्या संख्येने खूपच गर्दी बघायला मिळते. त्यामुळे कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी या ठिकाणी पोलीस विभागातर्फे तसेच मुक्ताई सेवा समितीतर्फे तगडा बंदोबस्त असतो.या दोन ते तीन महिन्यांमध्ये परिसरातील बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध होत असून या ठिकाणी नाश्त्याचे तसेच वेगवेगळ्या प्रकारचे दुकाने लावली जातात. त्यामुळे बेरोजगार युवकांनाही या तीन महिन्यात सुगीचे दिवस येतात. आणि म्हणूनच या दिवसांमध्ये या स्थळाचे आकर्षण दिवसेंदिवस अधिकच वाढत असल्याने चिमूर तालुक्यातील मुक्ताई हे क दर्जाचे प्रेक्षणीय स्थळ ठरत आहे.