जिल्हाधिका-यांकडून हर घर झेंडा अभियानचा आढावा
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर, दि. 26 जुलै : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर झेंडा’ अभियान राबविण्यात येत आहे. या तीन दिवसांत घरावरील तिरंगा झेंडा रात्रीसुद्धा डौलाने फडकवत ठेवता येणार आहे. मात्र शासकीय इमारतींवरील झेंडा ध्वज संहितेनुसार सुर्यास्तापूर्वी काढण्याच्या अटी व शर्ती कायम आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात ‘हर घर झेंडा’ अभियानाचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, पोलिस उपअधिक्षक (गृह) राधिका फडके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक स्वप्नील राठोड, तहसीलदार प्रिती डुडूलकर, पालिका प्रशासन अधिकारी अजितकुमार डोके आदी उपस्थित होते.
याबाबत जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने म्हणाले, फक्त 13 ते 15 ऑगस्ट या तीन दिवसात घरावर लावण्यात आलेला तिरंगा झेंडा रात्री खाली उतरविण्याची गरज नाही. याबाबत शासनाच्या मार्गदर्शक सुचना प्राप्त झाल्या आहेत. जिल्हा तसेच तालुका स्तरावर 75 फूट ध्वज उभारण्यासंदर्भात संबंधित यंत्रणेने त्वरीत जागा निश्चित करावी. ग्रामीण भागात ध्वजांची विक्री ही बचत गट किंवा स्वस्त धान्य दुकानातून करण्याबाबत जिल्हा परिषदेने नियोजन करावे, अशा सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
बैठकीला दूरदृष्य प्रणालीद्वारे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, जिल्हा परिषदेचे अधिकारी आदी उपस्थित होते.
घरोघरी लावण्यात येणा-या ध्वजा संदर्भात सर्वसाधारण अटी व शर्ती : राष्ट्रध्वज आयाताकृती आकाराचा असेल व त्याची लांबी व रुंदी 3:2 इतके राहील. बोधचिन्ह व नावे अधिनियम 1950 चा भंग करून विणिज्यिक प्रयोजनासाठी ध्वजाचा वापर करता येणार नाही. खाजगी अंत्यसंस्कारासह जे कोणतेही असेल अशा कोणत्याही स्वरुपातील आच्छादन म्हणून ध्वजाचा वापर करता येणार नाही. ध्वजावर कोणत्याही प्रकारची अक्षरे लिहिता येणार नाही. कोणतीही वस्तु घेण्याचे, देण्याचे, बांधण्याचे किंवा वाहून नेण्याचे साधन म्हणून वापर करता येणार नाही. ध्वजाचा जमिनीची स्पर्श होऊ देऊ नये किंवा तो पाण्यावरून फरफटत नेऊ नये. ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्यात येईल, अशा प्रत्येक ठिकाणी त्याची प्रतिष्ठा राखून आणि स्पष्टपणे दिसेल अशा रितीने लावला पाहिजे. फाटलेला अथवा चुरगळलेला ध्वज लावू नये. राष्ट्रध्वज अन्य कोणत्याही ध्वजासोबत एकाच वेळी एकाच काठीवर फडकवू नये.
राष्ट्रध्वजाच्या वर किंवा त्याच्या बरोबरीने अन्य कोणताही ध्वज किंवा पताका लावू नये. तसेच ज्या काठीवर ध्वज फडकवत ठेवला असेल त्या काठीवर किंवा काठीच्या वरच्या टोकावर फुले किंवा हार यासह कोणतीही वस्तु ठेवू नये अथवा बोधचिन्ह लावू नये. ध्वजाचा तोरण, गुच्छ अथवा पताका म्हणून किंवा अन्य कोणत्याही प्रकारे शोभेसाठी उपयोग करू नये. जेव्हा ध्वज मोकळ्या जागेत लावायचा असेल तेव्हा हवामानाची स्थिती विचारात न घेता शक्यतोवर तो सुर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत लावण्यात यावा. ध्वज फाटेल अशा कोणत्याही रितीने लावू नये किंवा बांधू नये आणि जेव्हा ध्वज फाटला असेल किंवा मळल्यामुळे खराब झाला असेल तेव्हा विशेषत: जाळून किंवा त्याची प्रतिष्ठा राखली जाईल, अशा अन्य कोणत्याही पध्दतीने तो खाजगीरित्या संपूर्णपणे नष्ट करावा.
या व्यतिरिक्त इतर आवश्यक सूचना, अटी व शर्तीसाठी ध्वज संहिता 2006 चे अवलोकन करावे, असे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.