जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर:-आविष्कार साहित्य मंचाने आयोजित केलेला आविष्कार उत्सव 2023 हा सोहळा अतिशय उत्साहात व दिमाखदारपणे पार पडला. या एक दिवसीय साहित्य संमेलनात उद्घाटन, परिसंवाद, कविसंमेलन व संगीत मैफिल असे एकूण चार सत्र ठेवण्यात आले होते. पहिल्या सत्रात कार्यक्रमाचे उद्घाटन ब्रम्हपुरीचे जेष्ठ साहित्यिक प्राचार्य श्याम झाडे यांनी केले. नियोजित अध्यक्ष प्राचार्य एन.एस.कोकोडे होते. संपूर्ण साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष अशोकजी रामटेके प्रामुख्याने पूर्ण वेळ उपस्थित होते. साहीत्य व समाजाची उदासीनता लक्षात घेता साहित्यिकांवर किंबहुना आयोजकांवर समाजजागृती करण्याची जबाबदारी येऊन ठेपली आहे, असे मत त्यांनी प्रतिपादित केले.
दुसरे सत्र परिसंवादाचे असून ‘समाजातील अंधश्रद्धा व साहित्यिकांची जबाबदारी’ या विषयावर वक्त्यांनी आपली मतं मांडली. दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष प्रा.डॉ.धनराज खानोरकर तर वक्त्यांमध्ये प्रा.डॉ.नरेंद्र आरेकर व प्रा.डॉ.विजय रेवतकर उपस्थित होते. दोन्ही वक्त्यांनी या ज्वलंत विषयावर जिवंत उदाहरणे देत उपस्थितांच्या मनपरिवर्तन करण्याचे काम केले. रेवतकर यांनी तर पुरातन काळापासून आधुनिक काळातील संदर्भ देत अंधश्रद्धा कशी निर्माण होत गेली हे समजावून सांगितले. साहित्यिकांनी सजग व सचेत राहून असे लेखन करावे की समाज श्रद्धा व अंधश्रद्धा यातील फरक ओळखू शकेल असे खानोरकर यावेळी बोलत होते. प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते डॉ.सुकेशीनी बोरकर यांच्या नाती काव्य सुमनांची या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
तिसऱ्या सत्रात कविसंमेलनाची सुरवात दमदार झाली व प्रसिद्ध कवी किशोर मुगल यांच्या अध्यक्षतेखाली ते पार पडले. किशोर कवठे, कल्पना सूर्यवंशी गेडाम इत्यादी कवी उपस्थित होते. कविसंमेलनात डॉ. चंद्रशेखर बांबोळे, इंजि. विजय मेश्राम, डॉ. नोमेश मेश्राम, बन्सी कोठेवार, सुरेश डांगे, मिलिंद उमरे, प्रवीण आडेकर, मुन्नाभाई नांदगगवळी, कल्पना गेडाम, रजनी सलामे आदी कवींनी आपल्या बहारदार कविता सादर केल्या.हसत खेळत कविसंमेलनाचे अतिशय वेधक निवेदन नरेश बोरीकर यांनी केले सर्वांना जिंकून घेतले.
चौथ्या सत्रात ब्रम्हपुरी च्या इतिहासात कधीही न घडलेली घटना होती ती म्हणजे गज़लनवाज भीमराव पांचाळे यांची संगीत मैफिल. श्रोत्यांच्या वन्स मोर, मूकर्रर् आणि फर्माईशी येत होत्या. मैफिलीसाठी उपस्थित राहिलेला एकही श्रोता शेवटपर्यंत जागचा हलला नाही हे विशेष. मैफिलीसाठी आलेली संपूर्ण टीम सुधाकर अमुस्कर, संदीप कपूर, देवेंद्र यादव, प्रशांत अग्निहोत्री, ऋषीकेश करमरकर या सर्वांनी आपापल्या कलेची छाप पाडली. पांचाळे यांनी आपल्या गायनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. मैफिलीचे दिलखेचक निवेदन हास्यजत्रा फेम अकोल्याचे किशोर बळी यांनी केले. इतकेच मला जाताना सरणावर कळले होते या गझलने मैफिलीचा व संमेलनाचा शेवट झाला तरीही श्रोते काढता पाय घेत न्हवते.
या एकदिवसीय साहित्य संमेलनाचे मुख्य संयोजक मंगेश जनबंधू, गौतम राऊत व भिमानंद मेश्राम होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वर्षा चौधरी, छाया जांभुळे सह आविष्कार साहित्य मंचाच्या सर्व कार्यकारिणीने परिश्रम घेतले. सुत्रसंचालन डॉ.सुकेशीनी बोरकर यांनी केले.