Breaking News

छत्रपतींच्या महाराष्ट्रात राहणारा भाग्यशालीच :- राज्यपाल रमेश बैस

जगदंबा तलवार, वाघनखं आणण्यासाठी सुधीरभाऊंच्या पाठिशी : एकनाथ शिंदे

शिवाजी महाराजांच्या विचारावरच राज्याचा कारभार : देवेंद्र फडणवीस

सहा दिवसात छत्रपतींचं तिकीट काढण्याचा रेकॉर्ड केल्याचं समाधान : मुनगंटीवार

350 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विशेष टपाल तिकिटाचे प्रकाशन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

मुंबई / चंद्रपूर, दि. 7 : छत्रपती शिवाजी महाराजांचे सामर्थ्य प्रचंड होते. आपण स्वत:ला भाग्यशाली समजतो की, आपण सर्व छत्रपतींच्या महाराष्ट्राचे निवासी आहोत, असे गौरवोदगार महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी काढले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सांस्कृतिक विभागातर्फे विशेष टपाल तिकिटाचे प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. राजभवन मुंबई येथे आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत आणि राज्यगिताने झाली. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, मुंबईच्या पोस्ट मास्तर जनरल स्वाती पांडे, सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, आदी उपस्थित होते. यावेळी विशेष टपाल तिकिटाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

आपल्या भाषणात राज्यपाल बैस यांनी सांस्कृतिक विभाग आणि सांस्कृतिक मंत्री  मुनगंटीवार यांचे शिवराज्याभिषेक सोहळा यशस्वी करून दाखविल्याबद्दल अभिनंदन व कौतुक केले. महाराजांनी आपल्या काळात समाजातील प्रत्येक घटकाला न्याय दिला, असे राज्यपाल  बैस म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य अभूतपूर्व आहे, त्यामुळे रयतेच्या राज्याचा रोज राज्याभिषेक केला तरीही कमीच आहे. तिकिटाच्या माध्यमातून छत्रपतींना शासनाने वंदन केले आहे. गडकोट किल्ल्यांचे जतन सरकार करणार आहे, असे ते म्हणाले. जगदंबा तलवार, वाघनखं परत आणण्यासाठी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार पूर्ण ताकदीने कामाला लागले आहेत. त्यामुळे जगदंबा तलवार आणि वाघनखं नक्कीच परत येतील असा विश्वास आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवाजी महाराज युगपुरुष असल्याचा उल्लेख केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतही काही लोक वाद निर्माण करीत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर राज्य सरकार काम करीत असल्याचे ते यावेळी म्हणाले.आपल्या भाषणात सांस्कृतिक कार्यमंत्री  मुनगंटीवार म्हणाले की, भविष्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जगात पोहोचविण्यासाठी संकल्प दिवस आज आहे. रयतेला सुखी ठेवण्याचे खरे वैचारिक सामर्थ्य छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये होते. डाक विभाग अस्तित्वात आल्यापासूनच्या आजपर्यंतच्या इतिहासात कधीच कोणतेही तिकिट इतक्या लवकर निघालेले नाही. एकमेव छत्रपती शिवाजी महाराजांवरील तिकिट सहा दिवसात सांस्कृतिक कार्य विभाग व डाक विभागाने एकत्र येत काढुन दाखविले, असे त्यांनी गौरवाने नमूद केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 वा राज्याभिषेक 1 हजार 108 मंगलकलशांनी करण्यात आला. मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाजवळ 450 शिवकालीन शस्त्राची पूजा करण्याचे सौभाग्य आपल्याला प्राप्त झाल्याचे  मुनगंटीवार म्हणाले. भारताचे नव्हे तर देशविदेशातही शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येतोय, असे मुनगंटीवार यांनी सांगताच राजभवनात टाळ्यांचा कडकडाट झाला. हिंदवी स्वराजांमधील मावळ्यांवरही तिकिट काढण्याचा मनोदय त्यांनी यावेळी व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांशी संबंधित अस्मितेशी आपण कधीही तडजोड करणार नाही, असे त्यांनी यावेळी ठणकावून सांगितले.

टपाल तिकिटासाठी सहकार्य करणाऱ्या पोस्ट मास्तर जनरल स्वाती पांडे, प्रवीण मोहिते, सुनिल कदम, चतूर निमकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

————

तीनशे भाषेत विकिपीडीया :

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील चरित्रासाठी व माहितीसाठी विकिपीडीयाने संपर्क साधला आहे. आम्ही त्यांना आवश्यक ती माहिती देणार आहोत. त्याच्या माध्यमातून शिवचरित्र जगातील 300 भाषांमध्ये प्रकाशित होईल, असे  मुनगंटीवार यांनी सांगितले.

————

महाराजांवर टॉकिंग बुक :

श्रीमद् भगवद्गितेप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांवर 20 भाषेत टॉकिंग ऑडिओ आणि व्हिडीओ बुक तयार करण्याचा मानस  मुनगंटीवार यांनी राजभवनातील कार्यक्रमादरम्यान व्यक्त केला. शिवाजी महाराजांवर नाणे प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यासंदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेशी बोलणी झालेली आहे. लवकरच शिवाजी महाराजांवर आधारित पोर्टलही येणार असल्याचे ना. मुनगंटीवार यांनी सांगितले.

————

राजभवनात चर्चेचा विषय :

आपल्या आगळ्यावेगळ्या कार्यशैलीसाठी  सुधीर मुनगंटीवार हे ओळखले जातात. इतरांपेक्षा काही तरी वेगळे करणाऱ्या मंत्र्यांमध्ये त्यांची गणना होते. भारतीय डाक विभागाच्या इतिहासात यापूर्वी १२ दिवसांत डाक तिकिट प्रकाशित झाल्याची नोंद होती. ही नोंदही तत्कालीन अर्थमंत्री असताना सुधीर मुनगंटीवार यांच्या नावे आहे. आता छत्रपती शिवाजी महाराजांवरील डाक तिकिट अवघ्या सहा दिवसात प्रकाशित करून घेण्याचा विक्रम आणि योगायोग  मुनगंटीवार यांच्या नावेच आहे. राजभवनात या विषयाची व मुनगंटीवार यांच्या कार्यशैलीची चांगलीच चर्चा झाली.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

निवडणूक काळात जप्त केलेल्या रकमेसंदर्भात जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर दि. 21 : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 …

सुपरहिट कन्नड चित्रपट ‘न्याय रक्षक’ येतोय अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर

मुंबई-राम कोंडीलकर मुंबई:-आईकडून मुलांना मिळणारं ज्ञान आणि संस्कार आयुष्याच्या जडणघडणीत पुरून उरत असतात. अशाच आई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved