उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा निवडणूक – 2024 च्या अनुषंगाने 75 – वरोरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणा-या सर्व उमेदवारांची निवडणूक खर्च लेखा तपासणी 8, 12 व 18 नोव्हेंबर 2024 रोजी करण्यात येणार आहे. सदर खर्च तपासणी वेळी उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 मधील कलम 77 मधील तरतुदीनुसार निवडणूक लढविणा-या उमेदवारांनी त्यांच्या निवडणूक खर्चाचे अभिलेखे उपलब्ध करून देणे अपरिहार्य आहे. त्यानुसार प्रथम खर्च लेखा तपासणी शुक्रवार दि. 8 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायं 5 वाजेपर्यंत, द्वितीय खर्च लेखा तपासणी मंगळवार, दि. 12 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत तर तृतीय खर्च लेखा तपासणी सोमवार दि. 18 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत उपकोषागार अधिकारी कार्यालय, वरोरा येथे करण्यात येईल.
75- वरोरा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक खर्च निरीक्षक धर्मेंद्र सिंग हे वरील दिनांकास व वेळेस उपकोषागार अधिकारी कार्यालय, वरोरा येथे खर्च तपासणीकरीता उपलब्ध राहणार आहे. जे उमेदवार खर्चाचे लेखे तपासणीकरीता सादर करणार नाही, त्यांच्यावर निवडणूक आयोगामार्फत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे वरोराचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दोन्तुला जेनित चंद्रा यांनी कळविले आहे.
००००००