
५०० कोटींच्या मागणी करीता मनपा स्थायी समितीचे सभापती विजय झलके यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
नागपूर, ता. २५ : कोरोनामुळे संपूर्ण राज्यासह नागपुरात सर्वच विकासकामे थांबली आहे. कोव्हीडमुळे मनपाच्या आर्थिक स्त्रोतावरही परिणाम पडला आहे. नागपूर शहरात आरोग्य सुविधा बळकट करण्यासाठी आणि विकासकामांना गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ५०० कोटी रुपयांचे विशेष आर्थिक अनुदान द्यावे, अशी मागणी नागपूर महानगरपालिका स्थायी समितीचे सभापती विजय (पिंटू) झलके यांनी केली आहे.
यासंदर्भात एक पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे. पत्रात नमूद केल्यानुसार, कोव्हिड-१९ च्या वाढत्या संक्रमणामुळे मनपाच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाला आहे. पाणी कर, मालमत्ता कर व अन्य स्त्रोतांद्वारे येणाऱ्या आर्थिक उत्पन्नावरही परिणाम झाला आहे. यामुळे अनेक विकासकामे खोळंबली आहे. नागपूर शहर उपराजधानीचे शहर आहे. हा विचार करून अत्याधुनिक हॉस्पीटल उभारण्यासाठी आणि विकास कामांना गती देण्यासाठी राज्य शासनातर्फे ५०० कोटींचे विशेष आर्थिक सहाय्य देऊन शहराच्या विकासात हातभार लावावा, अशी विनंती या पत्राच्या माध्यमातून सभापती विजय झलके यांनी केली आहे.