नागपूर, ता.२३ : जागतिक आरोग्य संघटना यांच्या संकल्पानुसार विश्वाला क्षयरोगापासून मुक्त करणे आवश्यक आहे. या अनुषंगाने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार, जागतिक आरोग्य संघटना व भारतीय आयुविज्ञान परिषद यांच्या माध्यमातुन राष्ट्रीय क्षयरोग प्रसार सर्वेक्षण कार्यक्रम नागपूरात सुरु करण्यात आला आहे. शहर क्षयरोग नियंत्रण सोसायटी मनपा नागपूर यांच्या वतीने नंदनवन, दर्शन कॉलोनी, सदभावनानगर, राजेन्द्र नगर, के.डी.के. कॉलेज रोड, वाठोडा, नारी, भांडेवाडी झोपडपटटी मध्ये सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
डॉ. शिल्पा जिचकार, शहर क्षयरोग अधिकारी यांनी सांगितले की, या सर्वेक्षणासाठी डॉ. ऋषीकेश आंधळकर, पथक प्रमुख राष्ट्रीय आयुर्विज्ञान परिषद यांच्या सोबत क्ष-किरण सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, आरोग्य सेवक व एक फिरते क्षयरोग संशोधन वाहन सर्वेक्षणासाठी देण्यात आले आहे. या सर्वेक्षणासाठी शहर क्षयरोग अधिकारी, मनपा नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा आरोग्य विभाग, त्या भागातील वैद्यकीय अधिकारी, आशा सेवक व इतर आरोग्य कर्मचारी यांची मदत मिळत आहे.
डॉ. शिल्पा जिचकार यांनी सांगितले की, क्षयरोग प्रसार सर्वेक्षण हा कार्यक्रम देशातील १६ राज्यामंध्ये चालू झाला होता. दरम्यान कोरोना परिस्थितीमध्ये हे सर्वेक्षण थांबविण्यात आलं होतं. ते पुन्हा सुरु करण्यात आलेलं आहे. या सर्वेक्षणामध्ये महाराष्ट्रातील काही भागांची निवड केलेली आहे. त्यामध्ये नागपूर महानगरपालिकेमधिल नंदनवन, दर्शन कॉलोनी, सदभावना नगर, राजेंद्र नगर, के.डी.के. रोड, वाठोडा, नारी, भांडेवाडी झोपडपटटी या भागाची निवड करण्यात आलेली आहे. त्या-त्या भागामध्ये या सर्वेक्षणाची चमु ७-८ दिवस थांबुन किमान ७०० लोकांची स्वैर (Random) पध्दतीने तपासणी करेल.
यामध्ये त्या भागातील नागरिकांची माहीती घेवून त्यांच्या छातीचा एक्सरे घेतला जाईल. यामध्ये क्षयरोगासारखी लक्षणे आढळल्यास त्यांच्या थुंकीची तपासणी CBNAAT मशिनवर केली जाईल. या सर्वेक्षणामध्ये मिळालेली माहीती क्षयरोगाचा प्रसार या संशोधनासाठी महत्वपुर्ण आहे. जगामधुन क्षयरोग हददपार करण्याच्या साध्यामध्ये हे सर्वेक्षण व त्याचे संशोधन अहवाल खुप महत्वपुर्ण भुमिका बजावतील.