जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- दिवाळीनिमित्त विविध वस्तूंची खरेदी करताना ग्रामीण भागातील स्वंयसहायता समुहांनी उत्पादीत केलेले खाद्यपदार्थ तसेच आकाशदिवे, उटणे इत्यादी साहित्यांची खरेदी करुन त्यांचा उत्साह आणि उत्पन्नात भर घालून ही दिवाळी अनोख्या पद्धतीने साजरी करावी, असे आवाहन डॉ.मित्ताली सेठी, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा अभियान संचालक,उमेद,जिल्हा परिषद,चंद्रपूर यांनी केली आहे.
मागील दोन वर्षात कोरोनाच्या परिस्थितीमुळे ग्रामीण उद्योजकांना बाजारपेठेच्या समस्येचा सामना करावा लागला. खरेदीदार नसल्याने स्थानिक स्तरावर अनेक नाविण्यपुर्ण उत्पादनांची विक्री होवू शकली नाही. त्यामुळे येत्या दिवाळीत ग्रामीण भागातील साहित्य खरेदी करुन त्यांचा उत्साह वाढविण्याची अनोखी संधी असल्याचे डॉ.मित्ताली सेठी यांनी म्हटले आहे.
उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्हयात मोठया प्रमाणात स्वयंसहायता समुह कार्यरत असून, यातील अनेक महिला या नाविण्यपुर्ण वस्तूंची निर्मिती करीत असतात. येत्या दिवाळीच्या पार्श्वभूमिवर या महिलांकडून विविध स्वरुपाची खाद्यपदार्थ तयार केले जाणार असून, शासकिय परिसरात या वस्तूंचे स्टॉल लावण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. एकमेकांना भेट देताना स्थानिक व ग्रामीण वस्तूचा वापर करावा, जेणेकरुन ग्रामीण भागातील महिलांच्या घरातही आनंद पोहोचेल असे त्यांनी म्हटले आहे. विशेष करुन शासकिय तसेच जि.प.अधिकारी/कर्मचारी यांनी आवर्जुन साहित्य खरेदी करावे असे त्यांनी आवाहन केले आहे.