आरोग्य व शिक्षण विभागाने समन्वय ठेवण्याच्या सुचना
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर, दि. 25 जुलै : ‘कोविड व्हॅक्सीन अमृत महोत्सव’ अंतर्गत जिल्ह्यात 15 जुलै ते 30 सप्टेंबर 2022 या 75 दिवसांत मोफत बुस्टर डोज देण्यात येणार आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने आरोग्य विभागाला सूक्ष्म नियोजन करण्याच्या सुचना केल्या आहेत. याच अनुषंगाने अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी कोविड लसीकरणाच्या प्रगतीचा जिल्हास्तरीय टास्क फोर्सच्या बैठकीत आढावा घेतला.
यावेळी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, पोलिस उपअधिक्षक (गृह) राधिका फडके, मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम, डॉ. मेश्राम आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात लसीकरणाची गती वाढविणे गरजेचे असून ठराविक दिवसात बुस्टर डोज देण्याचे उद्दिष्ट आपल्यासमोर आहे, असे सांगून श्रीमती वरखेडकर म्हणाल्या, शाळा – महाविद्यालयात 12 ते 14 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे सुध्दा लसीकरण करायचे आहे. त्यासाठी आरोग्य व शिक्षण विभागाने योग्य समन्वयाने काम करावे. शाळांमध्ये लसीकरणाचे विशेष सत्र लावले तर त्यात परिसरातील पात्र नागरिकांना बूस्टर डोज सुद्धा देणे सोयीचे होईल. प्रत्येक तालुक्यात लसीकरणाचे दैनंदिन उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नोडल अधिका-यांची नियुक्ती करा. गावात लसीकरणाचे सत्र लावण्याच्या दोन दिवसांपूर्वीपासून नोडल अधिका-यांनी गावक-यांमध्ये जनजागृती करावी. तसेच जिल्ह्यातील विविध आस्थापना जसे जिल्हा परिषद, पोलिस विभाग, बँका, न्यायालये, औष्णिक विद्युत केंद्र, विविध उद्योग आणि खाजगी आस्थापनांमध्ये लसीकरणाचे विशेष सत्र आयोजित करावे, अशा सुचना त्यांनी केल्या.
जिल्ह्यात 10 लक्ष 43 हजार 853 नागरिकांना बुस्टर डोज देण्याचे नियोजन असून यात 9 लक्ष 53 हजार 539 कोव्हीशिल्ड तर 90314 कोव्हॅक्सिनचा समावेश आहे. कोविड हॅक्सीन अमृत महोत्सव अंतर्गत चंद्रपूर महानगर पालिकेतर्फे आतापर्यंत 8021 कोविशिल्ड आणि 1513 कोव्हॅक्सीन असे एकूण 9534 डोज देण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.