Breaking News

समाजातील सर्व घटकांच्या विकासासाठी राज्य शासन कार्यरत – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

*महिला केंद्रीत धोरण आखले ; तरुणांच्या हाताला काम*

*उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते तीन प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण*

*आशा सेविकांना मोबाईल तर युवकांना नियुक्तीपत्र प्रदान*

प्रतिनिधी-नागपूर

नागपूर :- राज्य शासनाने महिला केंद्रीत धोरण आखले असून त्याची अंमलबजावणी सुरू आहे. युवकांच्या हाताला काम देण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ ही महत्त्वाकांक्षी योजना आणली आहे. सर्व समाज घटकांच्या विकासासाठी राज्यशासन कार्यरत असून निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करत जनहिताचे निर्णय गतीने घेण्यात येणार असल्याचे प्रतिपादन, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून आयोजित कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते आभासी पद्धतीने जिल्ह्यातील तीन नवनिर्मित आरोग्य केंद्रांच्या इमारती व निवासस्थानांचे लोकार्पण झाले. तसेच ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने’तील लाभार्थ्यांना नियुक्तीपत्रे आणि आशा सेविकांना त्यांच्या हस्ते अँड्रॉईड मोबाईल वितरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, आशिष जयस्वाल, परिणय फुके, अनिल देशमुख, अभिजीत वंजारी, टेकचंद सावरकर, सुधाकर आडबाले, प्रवीण दटके, कृपाल तुमाने, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, माता व बालमृत्यू तसेच कुपोषण रोखण्यासाठी आशा सेविका मोलाचे योगदान देत आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहचविण्याची जबाबदारीही त्या योग्यरित्या पार पाडत आहेत. त्यांच्या कामामध्ये सुकरता यावी आणि त्यांना विविध नोंदी घेता याव्या, माहितीचे संकलन करता यावे यासाठी जिल्हा खनिज निधीतून त्यांना मोबाईल वितरित करण्यात आले आहे. त्यांच्या मागणीनुसार येत्या काळात या मोबाईलसाठी जिल्हा खनिज निधीतून वार्षिक रिचार्जसाठी निधी देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आशा सेविकांच्या मानधनात भरघोस वाढ करण्यात आली आहे. या महिन्यापासूनच आशा सेविकांना वाढीव मानधन मिळणार असल्याचे श्री.फडणवीस म्हणाले. यासोबतच आशा सेविकांना 10 लाखांपर्यंतचे विमा कवच देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्य शासनाने महिला केंद्रीत धोरण आखले आहे. या अंतर्गत ‘मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण’ योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत अडीच कोटी महिलांना दर महिन्याला 1500/- रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे. राज्यात मुलींना प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मोफत देण्यात येत आहे. नुकतेच राज्य शासनाने मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शासकीय महाविद्यालयांमध्ये मोफत शिक्षणासह खाजगी महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांमध्ये 507 अभ्यासक्रमासाठी मोफत शिक्षण देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. महिला सन्मान योजनेच्या माध्यमातून एसटी बसच्या तिकिटांमध्ये महिलांना 50% सुट देण्याचा निर्णय घेतला व त्याची प्रभावी अंमलबजावणीही होत आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून महिलांना तीन सिलेंडर मोफत पुनर्भरण करुन देण्याची महत्वाकांक्षी योजना आणली आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे राज्यातील 10 लाख तरुणांना प्रशिक्षण देण्यात येणार असून महिन्याला दहा हजार रुपयांचे विद्यावेतन देण्यात येणार आहे. प्रशिक्षण कालावधीनंतर त्यांना प्रशिक्षण घेत असलेल्या कंपनी किंवा आस्थापनेमध्ये नोकरी मिळू शकेल. याशिवाय शासनाच्या विविध योजना व कार्यक्रमांतर्गत त्यांना स्वयंरोजगारासाठी स्वस्त दरात कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.गोर-गरीब जनतेला उत्तम आरोग्यसेवा उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री आरोग्य कक्षाद्वारे गोरगरिबांना देण्यात येणाऱ्या सोयी -सुविधांविषयी त्यांनी माहिती दिली. महात्मा फुले जन आरोग्य योजना आता राज्यातील सर्वच नागरिकांना लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत पाच लाखापर्यंतचे उपचार मोफत करण्याची सोय करुन देण्यात आली आहे.

तत्पूर्वी, उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते आभासी पद्धतीने काटोल तालुक्यातील झिल्पा आणि भोरगड तसेच पारशिवनी तालुक्यातील घाटपेंढरी येथील नवनिर्मित आरोग्य केंद्रांचे लोकार्पण करण्यात आले. नागपूर जिल्हा परिषदेद्वारे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांपैकी पाच उमेदवारांना प्रातिनिधिकरित्या नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. प्रातिनिधिक स्वरुपात जिल्ह्यातील 130 आशा सेविकांना अँड्रॉईड मोबाईल वितरण करण्यात आले.जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकड्डे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी प्रास्ताविक केले, रेणुका देशकर यांनी सुत्रसंचालन तर जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत यांनी आभार मानले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चिमूर तालुक्यात विविध सामाजिक सभागृहाचे लोकार्पण

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- चिमूर तालुका अंतर्गत मासळ जिल्हा परिषद क्षेत्रातील विविध गावात सामाजिक …

शिरपूर येथील नागरिकांनी पकडला अवैध रेती वाहतूक ट्रॅक्टर – महसूल विभागाने केला जप्त

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- गोरवट येथील रेती घाटावरील अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरला शिरपूर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved