Breaking News

मुंबईतील वीज खंडित प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्याचे निर्देश

या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सतर्कता बाळगा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई,दि. १२: मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या वीज वाहिन्यात बिघाड झाल्यामुळे सकाळी १० वाजताच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाला. तथापि, युद्धपातळीवर तीन साडेतीन तासातच बहुतांश वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. वीज पुरवठा खंडित झालेल्या घटनेची सर्वंकष चौकशी करण्याचे तसेच यापुढे याची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या अनुषंगाने घेतलेल्या बैठकीत दिले. या बैठकीत उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी वस्तुस्थिती सादर केली त्याचप्रमाणे रुग्णालये आणि रेल्वेचा वीजपुरवठा प्राधान्याने सुरळीत करण्यात आला अशी माहिती उर्जा विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता यांनी दिली.

मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा येथे बैठक घेतली. या बैठकीस ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. बैठकीस मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे तसेच बेस्ट, टाटा, अदानी या कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हा बिघाड अनपेक्षित होता की अपेक्षित होता किंवा यात काही गाफिलपणा झाला आहे का हे तपासण्याचे निर्देश देताना मुख्यमंत्र्यांनी ज्या कारणांमुळे ही घटना घडली त्या वाहिन्यांची दुरुस्ती युद्धपातळीवर करण्यास सांगितले. येणाऱ्या चार दिवसात मुसळधार परतीचा पावसाचा अंदाज असून यादृष्टीनेही वीजेच्या मागणीचा विचार करुन सतर्क राहण्याचे निर्देश त्यांनी दिले.

वीज खंडित होण्यामागील कारणे :

1) मुंबईला वीज पुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या चार ४०० केव्ही वीजवाहिन्या आहेत. या चारही वाहिन्या ४०० केव्ही कळवा उपकेंद्र येथे येतात व तेथून मुंबई महानगर प्रदेश क्षेत्राला वीज वितरित केली जाते. तसेच टाटा आणि अदानी यांचे एकत्रित १८०० मेगावॅट वीजनिर्मितीद्वारे वीजपुरवठा केला जातो.

2) त्या चार वाहिन्यांपैकी ४०० के. व्ही. कळवा-तळेगाव (पॉवरग्रीड) वाहिनी १० ऑक्टोबरला दुपारी १ वाजून ४७ मिनिटाला या वाहिनीचा कंडक्टर तुटल्यामुळे बंद झाली होती. तसेच झालेला बिघाड हा सह्याद्री रांगांच्या माथ्यावरील दुर्गम भागात असल्याने तेथे काम करणे अत्यंत खडतर असे असले तरीही तेथे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

३) ४०० के. व्ही. पडघा-कळवा वाहिनी-१ ही १२ ऑक्टोबरला पहाटे ४ वाजून ३३ मिनिटाला ओव्हर व्होल्टेजमुळे बंद पडली. तसेच या वाहिनीचे बाधित इन्सुलेटर बदलण्याचे काम चालू होते. तरीही मुंबईतील वीजनिर्मितीद्वारे व उर्वरित दोन वाहिन्यांच्या माध्यमातून वीजपुरवठा सुरळीत सुरू होता.

४) परंतु, सकाळी १० वाजून १ मिनिटांनी ४०० के. व्ही. पडघा-कळवा वाहिनी-२ तांत्रिक बिघाड झाल्याने बंद झाली आणि मुंबईची वीजव्यवस्था आयलॅंडिंगवर गेली. त्याचवेळेस टाटा पॉवरचे 500 मेगावॅट आणि अदानीचे 250 मे.वॅ.चे डहाणू येथील वीजनिर्मिती संच बंद झाल्यामुळे मुंबईतील वीज पुरवठा बाधित झाला.

अशा घटना सलग क्रमाने घडण्याची शक्यता संभवत नसल्या तरी देखील आज ही घटना घडल्यामुळे आपल्याला यापुढील काळात अधिक सावधानता बाळगावी लागेल तसेच यंत्रणेत आवश्यकता भासल्यास अधिक सुधारणा कराव्यात, असे निर्देशही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी दिले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

‘परवडणारी सिनेमागृहे’ उभारण्यासाठी राज्य शासन पुढाकार घेणार

– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे             मुंबई, दि. 5 : सिनेमा व नाटक हा समाजाचा आरसा आहे असे …

चंद्रपूरातील चांदा येथे आरटी-१ वाघ जेरबंद, मुख्यमंत्र्यानकडुन पथकांचे कौतुक

मुंबई, दि. २७ :- चंद्रपूर जिल्ह्यातील मध्य चांदा भागात दहशत माजविणाऱ्या वाघास आज दुपारी वन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved