सिंधुदुर्ग – उद्धव ठाकरे यांच्यासारखा निष्क्रिय मुख्यमंत्री महाराष्ट्रात झाला नाही. त्यांना राज्याच्या परिस्थितीचा शून्य अभ्यास आहे. लोक एवढे कोरोनाने बळी गेलेत आणि हा माणूस घरात बसून राहतो. पुराणे हाहाकार उडाला तेव्हा ते घरात बसून होते. आता ते बाहेर पडत आहेत. बाहेर पडून महाराष्ट्राला काय देणार आहेत ? असा प्रश्न नारायण राणे यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे सोमवारी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी सिंधुदुर्गात बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. राणे म्हणाले, मुख्यमंत्र्यांना त्यांची कर्तव्य माहित नाहीत. राज्यात कोरोनाने लोकांचे बळी गेलेत आणि हा माणूस घरात बसून राहतो. आता ते सोलापूरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र, आता वेळ उलटून गेली आहे. मुख्यमंत्र्यांचा राज्याच्या परिस्थितीबद्दलचा अभ्यास शून्य आहे, अशी टीका नारायण राणे यांनी केली.
तसेच या सरकारचा पायगुण चांगला नाही. राज्याची तिजोरी खाली आहे. दुष्काळी परिस्थितीत मदत करायला सरकारकडे पैसे नाहीत. सरकार फक्त घोषणा करत आहेत. प्रत्यक्षात मदत मिळाली नाही. मी परवाच जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो, त्यांना विचारलं तर ते म्हणाले अद्याप चक्रीवादळ नुकसानीचे पैसे आलेले नाहीत. हि परिस्थिती आहे. तरी आम्ही विरोधी पक्ष या नात्याने सरकारला या दुष्काळी परिस्थितीत सरकारला पैसे द्यायला भाग पाडू असेही नारायण राणे यांनी सांगितले.