Breaking News

मंकी पॉक्सबाबत घ्यावयाची काळजी आणि नियंत्रण उपाययोजना

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर, दि. 26 जुलै : केरळमध्ये मंकी पॉक्स आजाराचे दोन रुग्ण नुकतेच आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर या आजाराचे सर्वेक्षण, प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. मंकी पॉक्स हा एक विषाणूजन्य आजार आहे. 1970 मध्ये या आजाराचा पहिला रुग्ण कांगो येथे आढळला. मंकी पॉक्स हा आजार आर्थोपॉक्स व्हायरस या डीएनए प्रकारच्या विषाणूमुळे होतो. काही प्रकारच्या खारी आणि उंदरांमध्ये हा विषाणू आढळतो. हे प्राणी या विषाणूचा नैसर्गिक स्त्रोत आहे. या आजाराचा अधिशयन कालावधी 6 ते 13 दिवस, तथापि, हा कालावधी 5 ते 21 दिवसापर्यंत असू शकतो. रुग्णाचा संसर्गजन्य कालावधी हा अंगावर रॅश उठण्यापूर्वी 1-2 दिवसापासून ते त्वचेवरील फोडांवरील खपल्या पडेपर्यंत किंवा ते पूर्णपणे मावळेपर्यंत बाधित रुग्ण इतर व्यक्तींसाठी संसर्गजन्य असतो.

असा होतो मंकी पॉक्सचा प्रसार :

माणसापासून माणसास : थेट शारीरिक संपर्क, लैंगिक संपर्क किंवा जखम, घाव यातील स्त्राव. संपर्क बाधित व्यक्तीने वापरलेल्या कपड्यांमार्फत, जर खूप वेळा बाधित व्यक्तीचा संपर्क आला तर श्वसन मार्गातून बाहेर पडणाऱ्या मोठ्या थेंबावाटे. बाधित प्राणी चावल्यामुळे किंवा बाधित प्राण्याचे मांस न शिजवता खाण्यामुळे देखील या आजाराचा संसर्ग होऊ शकतो.

मंकी पॉक्स रुग्णाची व्याख्या :

मंकी पॉक्स सर्वेक्षणासाठी मंकी पॉक्सचा एक रुग्ण देखील साथरोग उद्रेक आहे. अशा प्रत्येक रुग्णाचे अन्वेषण शीघ्र प्रतिसाद पथकामार्फत करण्यात यावे. मंकी पॉक्स रुग्णांचे प्रयोगशाळेत नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, पुणे यांना पाठविण्यात यावे. प्रत्येक बाधित रुग्णाच्या निकट संपर्कातील व्यक्तींचे सर्वेक्षण करणे आवश्यक आहे. मंकी पॉक्स सर्वेक्षणासाठी, रुग्णालयातील सर्वेक्षण प्रत्येक रुग्णालयातील त्वचा व गुप्तरोग विभाग, मेडिसिन आणि बालरोग विभागातील सर्वेक्षणावर भर द्यावा. तसेच गोवर,रूबेला सर्वेक्षण करणारी पथके यांचा सहभाग घ्यावा. राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमातील जोखमीच्या लोकसंख्येच्या नियमित सर्वेक्षणातून महत्वपूर्ण माहिती मिळू शकते या दोन बाबी मंकी पॉक्स सर्वेक्षणासाठी महत्त्वाच्या आहेत.

मंकी पॉक्स आजाराची लक्षणे :

सर्वसाधारणपणे मंकी पॉक्स हा सौम्य स्वरूपाचा आजार असून रोगी 2 ते 4 आठवड्यात बरा होतो. तथापि, लहान मुलांमध्ये किंवा इतर काही रुग्णांमध्ये तो गंभीर स्वरूप धारण करू शकतो. या आजाराचा मृत्यूदर सर्वसाधारणपणे 3 ते 6 टक्के आहे. ताप, लसिका ग्रंथींना सूज (कानामागील, काखेतील व जांघेतील लसिका ग्रंथीना सूज येणे), डोकेदुखी, अंगदुखी, थंडी वाजणे, घाम येणे, घसा खवखवणे आणि खोकला ही लक्षणे दिसून येतात. कुपोषण, कृमी प्रादुर्भाव आणि प्रतिकारशक्ती कमी असलेल्या समुदायांमध्ये मंकी पॉक्स गंभीर स्वरूप धारण करू शकतो. मंकी पॉक्स सदृश्य इतर आजारामध्ये कांजण्या, नागिन, गोवर, सिफिलिस- दुसरी स्टेज, हॅन्ड, फूट माऊथ डिसीज आदीचा समावेश होतो. मंकी पॉक्समध्ये होणाऱ्या गुंतागुंतीमध्ये इतर संसर्ग, निमोनिया, सेप्सिस, मेंदूतील गुंतागुंत, दृष्टीपटलाचा संसर्ग यामध्ये दृष्टी देखील जाऊ शकते.

प्रयोगशाळा निदान करतांना संशयित मंकीपॉक्स रुग्णांचे नमुने घेताना पीपीईचा वापर करावा. रक्त, रक्तद्रव, फुटकळ्यातील द्रव आणि मूत्र हे नमुने निदानासाठी पाठविले जातात. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, पुणे येथे मंकी पॉक्ससाठी प्रयोगशालेय नमुने पाठविणे आवश्यक आहे. सॅम्पल पाठवितांना एन.आय.व्ही मधील डॉ. प्रज्ञा यादव 020260061111 आणि डॉ. रीमा सहाय 020-26006160 या तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. तसेच सॅम्पल पाठवितांना एन.आय.व्ही,पुणे येथे आयडीएसपी महाराष्ट्र यांना ssumaharashtra@gmail.com या ईमेलवर कळवावे.

मंकी पॉक्स रुग्णाला विलगीकरण कक्षात किंवा घरच्या-घरी वेगळ्या खोलीमध्ये ठेवणे आवश्यक आहे. या ठिकाणी स्वतंत्र वायूविजन, वेंटिलेशन व्यवस्था असावी. रुग्णाने ट्रिपल लेयर मास्क लावणे आवश्यक आहे. रुग्णाच्या कातडीवरील पुरळ, फोड नीट झाकले जावेत यासाठी त्याने लांब बाह्याचे शर्ट आणि पायघोळ पॅन्ट वापरावेत. जोपर्यंत रुग्णाच्या कातडीवरील पुरळ, फोड पूर्णपणे बरे होत नाही आणि त्यावरील खपल्या गळून जात नाही तोपर्यंत त्याला विलगीकरणात ठेवणे आवश्यक आहे. रुग्णाला लक्षणानुसार उपचार द्यावा, पुरेशा प्रमाणात हायड्रेशन मिळेल याची दक्षता घ्यावी. रुग्णांमध्ये डोळ्यात वेदना अथवा दृष्टी अधू होणे. श्वास घ्यायला त्रास होणे, छातीत दुखणे. शुद्ध हरवणे, झटके येणे. लघवीचे प्रमाण कमी होणे. रुग्णाने तोंडावाटे काहीही अन्नपाणी न घेणे. रुग्णास प्रचंड थकवा जाणवणे आदीप्रकारे गुंतागुंत निर्माण झाल्यास ताबडतोब तज्ञांचा सल्ला घ्यावा अथवा त्याला संदर्भित करावे.

मंकी पॉक्स न होण्यासाठी घ्यावयाची काळजी :

मंकी पॉक्स टाळण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे. मंकी पॉक्सचा प्रसार रोखण्यासाठी संशयित मंकी पॉक्स रुग्णास वेळीच विलग करणे. रुग्णाच्या कपड्यांची अथवा अंथरून पांघरूणांशी संपर्क येऊ न देणे. हातांची स्वच्छता ठेवणे. आरोग्य संस्थांमध्ये मंकी पॉक्स रुग्णावर उपचार करतांना पीपीईचा वापर करणे. मंकी पॉक्स आजाराचा प्रसार टाळणे म्हणजे त्या रुग्णाला वाळीत टाकणे नव्हे हे लक्षात घेणे देखील आवश्यक आहे. रोगप्रसार टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेऊन रुग्णाची निगा राखली जावी, आदी मंकी पॉक्सचा प्रसार रोखण्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. याप्रकारे कार्यक्षेत्रात मंकी पॉक्स सर्वेक्षण प्रतिबंध आणि नियंत्रण विषयक उपाययोजना अमलांत आणाव्यात, असे आवाहन आरोग्यसेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी केले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

कार्यालयाची गुंतवणूकदारांनी केली दाना दान “घोटण परिसरातील विग्ने यनामक एक भामटाही फरार” ???

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव 99 60051 755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील लाडजळगाव येथील …

जिल्ह्यासाठी 14 एप्रिल पर्यंत अलर्ट जारी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 11 : नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार 11 ते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved