Breaking News

नवजात बाळाची तस्करी करणाऱ्या जोडप्याला बल्लारपुर रेल्वे स्टेशनवर अटक

रेल्वे पोलिस व बाल संरक्षण कक्षाच्या कामगिरीमुळे बालक सुरक्षित

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर, दि. 27 : अहमदाबाद वरून विजयवाड़ा येथे नवजात बालकाची तस्करी करणाऱ्या जोडप्याला बल्लारपुर रेल्वे स्टेशनवर अटक करण्यात आली. सदर कारवाई रेल्वे पोलिसांनी केली असून त्यांच्या सतर्कतेमुळे बालक सुरक्षित आहे.

मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, दिनांक 25 डिसेंबर रोजी आर.पी.एफ व जी.आर.पी बल्लारपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नवजीवन एक्सप्रेसच्या (गाडी क्रमांक 12655) डब्बा क्रमांक एस-3 मध्ये आरपीएफचे कर्मचारी व रेल्वे चाईल्ड लाईनचे कर्मचारी यांनी तपासणी केली असता, बर्थ क्रमांक 23 वर एक जोडपे संशयास्पद स्थितीमध्ये दिसून आले. त्यांच्याकडे अंदाजे दोन ते तीन महिन्याचे नवजात बालक आढळून आले. सदर बालकाबाबत माहिती विचारली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. ते बाळ स्वतःचे असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु जोडप्याच्या वर्तणुकीवरून ते बाळ त्यांचे नसल्याचे दिसून येत होते.

त्यामुळे आरपीएफ बल्लारपूर यांनी सदर जोडप्याला बल्लारपूर रेल्वे स्टेशनला उतरवून पोलिस स्टेशनमध्ये आणले. त्यांची विचारपूस केली असता पुरुषाने आपले नाव चंद्रकांत मोहन पटेल (वय 40 वर्ष, पत्ता- इंदिरानगर, संगम सोसायटी, राणी सती मार्ग, मलाड ईस्ट, मुंबई) तर महिलेने आपले नाव द्रौपदी राजा मेश्राम (वय 40 वर्ष, पत्ता-आयबीएम रोड, धम्म नगर, गिट्टीखदान, काटोल रोड, नागपूर) असे सांगितले. त्यांच्यासोबतच दोन महिन्याचे असलेले बाळ त्यांचे नसल्याचीही कबूली त्यांनी दिली.

रेल्वे तिकीट बाबत विचारले असता अहमदाबाद ते विजयवाडा इथपर्यंतचे जनरल तिकीट नंबर डी-24 12 92 73 व डी-24 12 92 74 सादर केले. परंतु बालकाबाबत पुनश्च विचारले असता योग्य उत्तरे दिले नसल्यामुळे त्यांच्याजवळचा मोबाईल तपासण्यात आला. त्यामधील रेकॉर्ड व व्हाट्सअप चॅटिंग वरून स्पष्ट झाले की, सदर बाळ हे अहमदाबाद वरून तस्करी करून विजयवाडा येथे घेऊन जाण्यात येत होते. महिलेला अधिक विचारपूस केली असता संशयित व्यक्तीने बाळाला सोबत घेऊन जाण्याचे पाच हजार रुपये दिले होते, असे सांगितले. तर सोबत असलेल्या संशयित व्यक्तिला विचारले असता अहमदाबाद स्टेशनवर मला दोन व्यक्तीने बाळाला विजयवाडा येथे पोहोचून देण्याची जबाबदारी दिली होती, अशी कबुली दिली.

वरील प्रकरणाबाबत दोन्ही व्यक्तिंनी बरीच माहिती लपविण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले. आरपीएफ बल्लारपूरचे उपनिरीक्षक प्रवीण महाजन, महिला हेड कॉन्स्टेबल आरती यादव, आरपीएफ चंद्रपूरचे प्रवीण गाढवे, पोलीस उपनिरीक्षक ए.एस.अली तसेच डी. गौतम, अखिलेश चौधरी यांनी कार्यवाहीत भाग घेतला. कार्यवाहीदरम्यान रेल्वे चाईल्ड लाईन यांच्याकडे बाळ तात्पुरते ठेवण्यात आले. सदर बाळाची माहिती मिळताच बालकल्याण समिती चंद्रपूर आणि अजय साखरकर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांना देण्यात आली. त्यानुषंगाने महिला व बालविकास अधिकारी दिपक बानाईत व पोलीस उपअधिक्षक राधिका फडके यांच्या मार्गदर्शनात माहिती मिळताच जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी पुढील कार्यवाहीसाठी समन्वय साधून जीआरपी पोलीस उपनिरीक्षक अली यांच्यासोबत चर्चा केली. रेल्वे सुरक्षा बलाचे पोलिस निरीक्षक के.एन.रॉय चंद्रपूर यांच्याद्वारे दोन्ही संशयित व्यक्तीवर रात्री उशीरा भारतीय दंड संहिता नुसार कलम 370 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यानंतर रेल्वे चाइल्डलाईन यांच्या सहकार्याने बालकाची शासकीय रुग्णालय, बल्लारपूर येथे वैद्यकीय तपासणी करून इतर कार्यालयीन प्रक्रिया झाल्यानंतर रेल्वे चाइल्ड लाईनचे समन्वयक भास्कर ठाकूर, समुपदेशिका त्रिवेणी हाडके, सुरेंद्र धोंडरे, अचल कांबळे व जीआरपी कर्मचारी बाळाला बाल न्याय (मुलांचे काळजी व संरक्षण)अधिनियम 2015 अन्वये किलबिल दत्तक योजना व पूर्व प्राथमिक बालगृह चंद्रपूर येथे काळजी व संरक्षणासाठी रात्री दाखल करण्यात आले.

दि. 26 रोजी सदर बाळाला बालकल्याण समिती समोर उपस्थित करून तात्पुरता दाखल आदेश देण्यात आला. सदर प्रकरणाची माहिती बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. व पोलिस विभागाला दिली.

बालकांच्या तस्करी बाबत गोपनीय माहिती असल्यास प्रशासनाला कळविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन बालकांची तस्करी तसेच बालविवाहास आळा घालण्यासाठी जिल्ह्यात बालकाशी निगडीत यंत्रणा सतर्कतेने काम करीत आहे. बालकांच्या तस्करी बाबत गोपनीय माहिती प्रशासनाला कळविल्यास संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. तसेच बालकांचे भविष्य सुरक्षित करता येईल. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल. बालकांच्या तस्करीच्या घटना तसेच आपल्या परिसरात लैंगिक अपराध व बालविवाहाची माहिती असल्यास जिल्हा बाल संरक्षण अधिकारी किंवा महिला व बालविकास अधिकारी, चंद्रपूर तसेच चाईल्ड लाईनच्या 1098 या टॉल-फ्री क्रमांकावर द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी केले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शेवगाव शहराच्या माणाचा तुरा खोवणाऱ्या तेजस प्रवीण मगर आणि किरण प्रवीण मगर बंधूंचा पटेल परिवार तर्फे शीरखुर्मा पार्टीमध्ये यथोचित सन्मान

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त शेती शेवगा शहरातील दोन सख्खे भाऊ नुकत्याच …

मतदानाचा सेल्फी, रिल्स्, पोस्टर्स, मिम्स् स्पर्धेचा निकाल जाहीर

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घेतली होती स्पर्धा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 25 : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved