नागपूर, दि. 26 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशाची अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे. अशा वेळी क्षेत्राच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला नवी उभारी मिळू शकते. खरीप हंगामाच्या मुहुर्तावर पीक कर्जासाठी विभागातील सर्व पात्र शेतकरी सभासदांना बँकांनी जलद गतीने कर्ज उपलब्ध करुन देण्याचे निर्देश इतर बहुजन कल्याण विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज येथे दिले. राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्ज वितरणाची गती वाढविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
विभागीय आयुक्त कार्यालयात खरीप हंगाम 2020 पीक कर्ज वाटपाबाबत बँकांची आढावा सभा घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, विभागीय सहनिबंधक प्रवीण वानखेडे, जिल्हा उपनिबंधक अजय कडू व विविध बँकांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. या बैठकीत नागपूर, भंडारा, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या ठिकाणाहून जिल्हाधिकारी तसेच बँकांचे प्रतिनिधी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते.
सध्या शेतकरी अडचणीत असून त्यांना पीक कर्जाची आवश्यकता आहे. या अनुषंगाने बँकांनी अडवणुकीचे धोरण न ठेवता सर्व पात्र सभासदांना पीक कर्ज उपलब्ध करुन देणे अत्यंत गरजेचे असल्याचे श्री. वडेट्टीवार यांनी सांगितले. अनेक राष्ट्रीयीकृत बँकांनी दिलेले उद्दिष्ट पूर्ण केलेले नाही. काही बँकांनी केवळ 10 ते 15 टक्के कर्ज वितरित केले आहे. ही बाब गंभीर असून उद्दिष्टपूर्ती न करणाऱ्या बँकांबाबत श्री. वडेट्टीवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. येत्या 15 जुलैपर्यंत 50 टक्क्यांहून अधिक उद्दिष्टपूर्ती करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत कर्ज वितरणाचा वेग अतिशय कमी असल्याचे नमूद करुन श्री. वडेट्टीवार म्हणाले की, कर्ज वितरणाचा वेग वाढविण्यात यावा. 15 जुलै रोजी सकाळी 11 वाजता खरीप हंगाम पीक कर्ज वाटपाचा पुन्हा आढावा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पीक कर्जासाठी अडवणूक करणाऱ्या बँकांवर गुन्हा नोंदविण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
राष्ट्रीयीकृत बँकांनी नागपूर विभागात 24 जून अखेर 2 लाख 1 हजार 837 शेतकरी सभासदांना 1422 लाख 66 हजार रुपयांचे कर्ज वितरित केले आहे. कर्ज वितरणाची टक्केवारी 37.28 टक्के एवढी आहे. बँकांनी शेतकऱ्यांपर्यंत जाऊन कर्ज वितरित करावे. तसेच गावोगावी कर्ज वितरण मेळावे आयोजित करावे. असा सल्ला त्यांनी दिला. या बैठकीत नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्याचा जिल्हा व बँकनिहाय कर्ज वितरणाचा आढावा घेण्यात आला.