Breaking News

कोरोनाबाधित रुग्णांना मिळणार आता जलद उपचार : डॉ. नितीन राऊत

  • नागपुरातील खाटांची संख्या,ऑक्सिजन,औषधांची उपलब्धता आणि मनुष्यबळ समस्या नियंत्रणात
  • मृत्यू संख्या कमी करण्यासाठी सर्व आघाडीवर प्रयत्न
  • ‘माझे कुटुंब – माझी जबाबदारी ‘ अभियानातून वाढवा रिकव्हरी रेट

नागपूर दि. २१ : कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी येणाऱ्या अडचणीमधील खाटांची संख्या, ऑक्सिजनची उपलब्धता, कोरोना आजारा संदर्भातील औषधांचा साठा, समर्पित कोवीड रुग्णालयांची संख्या वाढ आणि यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळाची उपलब्धता या सर्व कळीच्या मुद्द्यांवर तूर्तास मात केल्याचे समाधान आजच्या आढावा बैठकीत पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केले. जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, पोलीस प्रशासन व जिल्हा परिषद यामध्ये यापुढेही उत्तम समन्वय ठेऊन कोरोना नियंत्रित ठेवण्याचे निर्देश आज व्हीसीव्दारे दिले.

पालकमंत्री डॉ. नितीन राऊत सध्या रुग्णालयात दाखल आहेत. त्यांनी आज मुंबई येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीला नागपूर येथून विभागीय आयुक्त संजीव कुमार यांच्यासह महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण बी, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, मुख्य कार्यपालन अधिकारी योगेश कुंभेजकर, अतिरिक्त पोलिस आयुक्त नीलेश भरणे, अपर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, मेयोचे अधिष्ठाता डॉ.अजय केवलीया,निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांची, जिल्हा शल्यचिकित्सक देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सेलोकार यांच्यासह विभाग प्रमुख सहभागी झाले होते.

आजच्या आढावा बैठकीमध्ये नागपूर जिल्ह्यातील व शहरातील कोरोना बाधित दुरुस्त होण्याचा दरात लक्षणीय वाढ आहे. रुग्णांसाठी शहरांमध्ये खाटांची संख्या कमी असल्याची मधल्या काळात ओरड होती.महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणात खाजगी हॉस्पिटल ताब्यात घेतले असून आता मोठ्या प्रमाणात बेड उपलब्ध झाले आहेत. खाटांचे उपलब्ध ते संदर्भातील माहिती आता सहज डॅश बोर्डवर उपलब्ध होत आहेत.

मेयो आणि मेडिकल याठिकाणी खाटांचे व्यवस्थापन व अन्य प्रशासन सांभाळण्यासाठी आयएएस अधिकाऱ्यांच्या नेमणुकीनंतर या समस्येवर मात करण्यात यश आले आहे. तसेच मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेने ताब्यात घेतलेल्या खाजगी हॉस्पिटलच्या अवास्तव बिल आकारणीवर देखील नियंत्रण आले आहे. या कामी महानगरपालिकेने कोरोना मित्रांची नियुक्ती केली आहे.
जिल्ह्यात व शहरात सध्या 65 नव्या ॲम्बुलन्स सज्ज असून प्रत्येक झोनला त्याचे वितरण करण्यात आले आहे. खाटांची उपलब्धता, ॲम्बुलन्सची उपलब्धता, या संदर्भात आवश्यक असणारा दूरध्वनी क्रमांक 2567021 दिला जात असून या दूरध्वनी क्रमांकावरून देखील गेल्या काही दिवसात तीनशेच्यावर खाटांचे वितरण झाले आहे. पंधरा ते वीस मिनिटात ॲम्बुलन्स उपलब्ध होण्याची सुविधादेखील आता नागरिकांना मिळत आहे. आत्तापर्यंत 1800 रुग्णांनी कोरोना संक्रमण काळात याचा लाभ घेतला आहे.

याशिवाय खाजगी व शासकीय वैद्यकीय सुविधांसाठी वॉर रूम गठीत करण्यात आली आहे. याठिकाणी कोवीड पॉझिटिव्ह रुग्णांपासून मृत्यू पडलेल्या रुग्णांची देखील नोंद घेतली जात आहे.

यापूर्वी शहरामध्ये केवळ 34 ठिकाणी कोरोना चाचणी घेतली जात होती. आता चाचणीची गती वाढविण्यात आली असून 55 ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. सरासरी 6 हजार नागरिकांची दररोज चाचणी होत आहे. त्यामुळे रुग्ण संख्या जरी वाढत असली तरी मोठ्या प्रमाणात बरे होणाऱ्यांची संख्या पुढे येत आहे.
ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे गेल्या पंधरा दिवसांपूर्वीची परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे.आजच्या आढावा बैठकीत गेल्या सात दिवसांपासून ऑक्सिजनचा पुरवठा मुबलक उपलब्ध असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले. अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके हे यासंदर्भात नोडल अधिकारी असून ऑक्सिजनची उपलब्धता कायम राहील यासाठीची समिती दररोज या संदर्भात आढावा घेत आहे.

सध्या 356 व्हेंटिलेटरची उपलब्धता जिल्ह्यामध्ये आहे. मात्र भविष्यातील कोरोना वाढीचा वेग लक्षात घेता शासकीय व खाजगी रुग्णालयातील ही सुविधा वाढविण्याचे निर्देश आजच्या बैठकीत पालकमंत्र्यांनी दिले असून यासंदर्भात समन्वय समिती स्थापन करण्याची सूचना त्यांनी केली आहे.

सध्याच्या उपलब्ध आरोग्य व्यवस्थेला जोड म्हणून महानगरपालिकेचे आणखी चार हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने कोरोना रुग्णांच्या सेवेत पुढील आठ दिवसात दाखल होणार असल्याचे महानगर पालिका आयुक्तांनी आढावा बैठकीत स्पष्ट केले. यासोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर रूग्णालय देखील सज्ज करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. राऊत यांनी दिले. खाजगी व शासकीय रुग्णालयाच्या क्षमतेत वाढ झाल्यामुळे लवकरच जिल्ह्यातील नागरिकांना कोरोना उपचारासाठी वॉकिंग फॅसिलिटी उपलब्ध होणार आहे.

विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार यांनी जिल्ह्यामध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. तसेच गेल्या दोन महिन्यातील रुग्ण वाढ लक्षात घेता नागरिकांच्या शरीरात अँटीबॉडीज विकसित झाल्यात काय? या संदर्भात देखील चाचपणी करण्यात येणार असल्याचे सांगितले. रुग्ण बरे होण्याच्या दरात वाढ करण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेला आणखीन सक्रीय करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

विभागीय आयुक्तांनी यावेळी खाटांच्या उपलब्धतेचा प्रश्न सोडविण्या सोबतच चारशे अतिरिक्त आयसीयू बेड निर्माण करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे गेल्या महिनाभरात केलेल्या कामाचे कौतुक केले.तथापि, प्लाज्मा दान करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. आशा वर्कर, एएनएम व डॉक्टरांचे मानधन यासंदर्भात विभागीय आयुक्त यांच्या मार्गदर्शनात तोडगा काढण्याचे निर्देश दिले. कोरोना रुग्णांना मोठ्या प्रमाणात सिटीस्कॅन करावे लागते. यासंदर्भात खाजगी रुग्णालयांमध्ये काही ठिकाणी वाढीव दर आकारले जात असल्याच्या तक्रारी आहे. त्यामुळे हे दर नियंत्रणात आणण्याचे देखील यावेळी सांगण्यात आले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 25 जून ते २४ जुलै या कालावधीत

बीएलओ करणार 25 जून ते २४ जुलै या कालावधीत घरोघरी भेटी देऊन मतदार यादीची तपासणी …

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गतचे सर्व प्रस्ताव 1 जुलै पर्यंत स्विकारले जाणार

नागपूर, दि.20 : जिल्हा वार्षिक योजना 2024-25 अंतर्गत मंजूर नियतव्ययाच्या मर्यादेत येत्या 1 जुलैपर्यंत सर्व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved