मुंबई : राज्यसभेत कृषी विधेयके मंजूर करताना झालेल्या गोंधळावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली असून ही विधेयके तात्काळ रद्द करा, अशी मागणी यावेळी त्यांनी केली आहे. ही विधेयके सादर होत असताना विरोधकांना काही आक्षेप होते, पण सत्ताधाऱ्यांनी काम रेटून नेण्याचा प्रयत्न केला, अशी टीका शरद पवारांनी केली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
याचसोबत आज सदस्यांनी अन्नत्याग केला असून मीदेखील त्यांच्यात सहभागी होत आज दिवसभर अन्नत्याग करणार असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. ‘सभागृहात दोन ते तीन दिवस चर्चा होणे अपेक्षित असते. पण ही विधेयके तातडीने मंजूर करावी असा सत्ताधारी पक्षाचा आग्रह होता असे दिसत आहे. सदनाचं काम रेटून पुढे नेण्याचा प्रयत्न असावा असे दिसत होतं’ अशी टीका शरद पवार यांनी या कृषी विधेयकावर केली आहे.
मराठा आरक्षणावरही त्यांनी आपले मत मांडले, मराठा आरक्षण प्रकरणी अपील लवकर करण्याची गरज असल्याने मला दिल्लीत जाता आले नाही असे त्यांनी सांगितले. यानंतर धनगर आरक्षणाबाबतही शरद पवारांनी आपली भुमिका मांडली. ‘धनगर समाजाला स्वंतत्र आरक्षण मिळावे ही राष्ट्रवादीची भुमिका आहे, याबाबत सरकारची काय भुमिका असेल हे सरकार ठरवेल असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.