सोसायटीमध्ये मोठया ‘बल्क कन्झूमर्स’ला मिळणार स्वतंत्र नळ कनेक्शन
नागपूर, ता. १३ : अमृत योजनेंतर्गत नागपूर शहरात सर्वच झोनमध्ये काम सुरू आहे. यामध्ये लकडगंज झोनचे कार्य जवळपास पूर्णत्वास आले असून लवकरच लकडगंज झोन टँकरमुक्त होईल. याशिवाय मोठ्या इमारतींच्या सोसायटीमध्ये पाणी पुरवठ्यासंबंधी येणा-या तक्रारीवर उपाय म्हणून अशा ‘बल्क कन्झूमर्स’ना स्वतंत्र नळ कनेक्शन देण्यात येणार आहे. यासाठी इमारतीच्या परिसरात पाण्याच्या टाकीसाठी जागा उपलब्ध असणे अत्यावश्यक आहे, अशी माहिती मनपाचे जलप्रदाय तथा स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी दिली.
विविध विषयांच्या अनुषंगाने मंगळवारी (ता.१३) जलप्रदाय समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीत जलप्रदाय तथा स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, समितीचे सदस्य जुल्फेकार भुट्टो, अधीक्षक अभियंता (जलप्रदाय) श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता मनोज गणवीर, ओसीडब्लू चे संजय रॉय, के.एम.पी.सिंग, राजेश कालरा यांच्या उपस्थितीसह व्हिडिओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून समितीचे अन्य सदस्य व डेलिगेट्स जुळले होते.बैठकीत जलप्रदाय तथा स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी अमृत पाणी पुरवठा योजना, २४x७ पाणी पुरवठा योजना, पाणी पट्टी वसूली आदी विषयांचा आढावा घेतला.
अमृत योजनेंतर्गंत नागपूर शहरामध्ये ३७७ किमी चे काम प्रस्तावित आहे. यामध्ये संपूर्ण शहरात ४२ टाक्या आणि एक जीएसआर बनविणे अपेक्षित असून याचे काम सुरू आहे. अमृत योजनेच्या कामामध्ये लकडगंज झोनचे कार्य आघाडीवर असून लवकरच झोन टँकरमुक्त होणार आहे. अमृत योजनेमुळे लकडगंज झोनमध्ये ३५ टँकर आणि त्यांच्या ३०० फे-या कमी होणार आहेत. येत्या १ नोव्हेंबरपासून झोनच्या या फे-या बंद करण्यात येणार असून झोन टँकरमुक्त केले जाईल, अशी घोषणा यावेळी जलप्रदाय तथा स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी केली.
नागपूर शहरात असलेल्या मोठ्या रहिवासी सदनीकांच्या समुहामध्ये एकच नळ कनेक्शन असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यासंदर्भात समितीकडे अनेक तक्रारीही प्राप्त झाल्या आहेत. अशा इमारतींमधील रहिवासी नागरिकांच्या सुविधेच्या दृष्टीने ‘बल्क कन्झूमर’ला स्वतंत्र नळ कनेक्शन देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यामुळे आता समुहांच्या सदनीकांमध्ये प्रत्येक इमारतीसाठी वेगळे नळ कनेक्शन असेल. मात्र यासाठी इमारतीच्या परिसरात भूमिगत पाण्याची टाकी (सम्प साठी) तयार करण्यासाठी जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे, असेही विजय झलके यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे सदनीकांमध्ये नागरिकांचे होणारे आपसी वाद सुटतील, नागरिकांना सुविधाही मिळेल आणि मनपाला आर्थिक लाभ सुद्धा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शहरात पाणी पुरवठा योजनेचे सुमारे ३ लाख ३० हजार उपभोक्ता आहेत. यापैकी सुमारे १ लाख उपभोक्तांना २४x७ योजनेमध्ये परिवर्तीत करण्यात आले असून उर्वरित उपभोक्त्यांसंदर्भात काम सुरू आहे. याशिवाय एप्रिल २०२० ते आजपर्यंत ७२.२६ कोटी पाणी पट्टी कर वसूल करण्यात आले आहे. मागील वर्षी ७२.९६ कोटी पाणी कर वसूल करण्यात आले होते.