नागपूर
संपूर्ण भारताच्या केंद्रस्थानी असणाऱ्या नागपूर शहराचे ऐतिहासिक आणि इंग्रजकालीन महत्त्व झिरो माईल्समुळे आहे. त्यामुळे या ठिकाणच्या सौंदर्यीकरणात नागपूरची भव्यता, नागपूरचे स्थळ महात्म्य आणि नागपूरचा इतिहास ठसठशीतपणे दिसला पाहिजे, अशा पद्धतीचे नियोजन करण्याचे निर्देश ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री नितीन राऊत यांनी आज येथे दिले.
“प्रत्येक शहराला एक इतिहास असतो. नागपूर शहराचा इतिहास हा प्राचीन आहे. तसाच तो भारताच्या रचनेमध्ये केंद्रस्थानी आहे. त्यामुळे झिरो माईल्सचे सौंदर्यीकरण भारताच्या हृदयस्थानी जोपासले जाईल असे असावे “, असे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पासाठी फ्रान्सचे वास्तुविशारद नेमण्यात आले आहे. यासंदर्भातील स्थानिक स्तरावरच्या सर्व मान्यता देण्यात येईल. रस्ता बंद करण्याबाबतच्या प्रश्नावर देखील विभागीय आयुक्त हस्तक्षेप करून लवकर तोडगा काढतील, असे निर्देश आज पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये आमदार अभिजित वंजारी, विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, नागपूर मेट्रोचे अभियंता एम.आर. पाटील,नागपूर सुधार प्रन्यास व महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये सौंदर्यीकरण व विस्तारीकरणामध्ये झिरो माईल्स जवळून जाणारा रस्त्याची अडचण येत असल्याचे पुढे आले. भवन्स विद्यालयाकडून येणाऱ्या या रस्त्याला बंद केल्यास अधिक जागा मिळू शकते. तसेच त्यामुळे मोठ्या प्रमाणात सौंदर्यीकरणही केले जाऊ शकते. याबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. यावर पालकमंत्री श्री. राऊत यांनी वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलणी करून यावर तातडीने तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांनी नागपूरला साजेल अशा पद्धतीने विस्तारीकरण व सौंदर्यीकरण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. नागपूरच्या तसेच भारताच्या हृदयस्थानी असणारी ही जागा ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाची असून दीर्घकाल नागपूरच्या सौंदर्यात भर घालणारी निर्मिती व्हावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
झिरो माईल्सचे महत्त्व पूर्ण देशांमध्ये या ठिकाणावरून गेले पाहिजेत. या ठिकाणचा इतिहास या निर्मितीमध्ये उभा राहिला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी उपस्थित अभियंते व वास्तुविशारद यांच्याकडे व्यक्त केली.