
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर तालुक्यातील वडाळा पैकू येथील प्रभाकर सातपैसे यांनी आत्मा वनधन जन-धन योजने अंतर्गत 50 टक्के सबसिडीवर कोणतेही साहित्य मिळतात म्हणून तालुक्यातील अनेक नागरिकांनी या योजनेत पैसे गुंतवले होते. मात्र साहित्य आज येते उद्या येते म्हणून अनेक नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा दिला याबाबद्द अनेकदा पोलीस स्टेशन चिमूर ला तक्रार दिली होती मात्र पोलीस निरीक्षक धुळे यांनी सामंजस्य करून प्रकरण सोडविण्याकडे जास्त लक्ष दिले होते. मात्र त्याचा नागरिकांना काहीच फायदा झाला नाही शेवटी नागरिक त्रासून गेले आणि अजून एकदा चिमूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार मनोज गभने यांच्याकडे तक्रार केली या तक्रारीची दखल घेऊन ठाणेदार मनोज गभने यांनी आत्मा वनधन जन-धनच्या सातपैसे यांना नुकतीच अटक केली.
चिमूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी राकेश महादेवराव बरबटकर वय 41 वर्ष, रा. टिळक वार्ड चिमुर जि. चंद्रपूर यांना अंदाजे २ वर्षाचे पुर्वी आत्मा वनधन जन-धन इंडिया फाऊंडेशन नागपूर या योजनेमध्ये ५०% सबसिडीवर गिट्टी, लोहा, सिमेंट, स्प्रिंकलर पाईप, टू व्हिलर, फोर व्हिलर, ट्रॅक्टरचे उपकरणे, शेतीउपयोगी उपकरणे व किराणा असे विविध साहित्य मिळत असल्याची माहिती मिळाल्याने स्वतःचे आधार कार्ड, पासपोर्ट फोटो व ११०० रु. नगदी असे कागदपत्रे सादर करुन आत्मा वनधन जन-धन योजनेचे प्रमाणपत्र प्राप्त केले. त्यानंतर फिर्यादीस योजने अंतर्गत होंडा अॅक्टीवा मोपेड खरेदी करायचे असल्याने दिनांक २०/०३/२०२१ रोजी दुपारी १२/३० वा. दरम्यान आरोपी प्रभाकर सातपैसे रा. वडाळा (पैकु) यांची भेट घेतली असता आरोपीने” आमची योजना RBI शी सलग्न असुन केंद्र शासन पुरस्कृत व पुर्णपणे सरकारी आहे” असे सांगुन २०% सबसिडीवर पंधरा ते एक महिण्यामध्ये होंडा अॅक्टीवा वाहन उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन देऊन ७१,७०६ रु. नगदी स्विकारले. परंतु वाहन उपलब्ध करुन दिले नाही किंवा रक्कम सुध्दा परत केली नाही.
फिर्यादीने आरोपीस वेळोवेळी मोबाईलवर संपर्क केला व प्रत्यक्ष भेटुन विचारणा केली परंतु आरोपीने उडवा उडवीचे उत्तरे देऊन रक्कम परत करण्यास टाळाटाळ केली. फिर्यादी यांचे प्रमाणेच चिमुर तालुक्यातील १) प्रमोद मोरेश्वर श्रीरामे रा. खडसंगी यांचेकडुन २,७२,००० रु. २) रामचंद्र मणिराम पाटील रा. पिंपळनेरी यांचेकडुन ७०,००० रु.३) प्रविण वासुदेव रासेकर रा. वडाळा (पैकु) यांचेकडुन ४५,००० रु. ४) विशाल गंपावर रा. चिमुर यांचेकडुन ३,००,००० रु. असे एकुण ६,८७,००० रु. घेऊन त्यांना सुध्दा विविध साहित्य दिले नाही किंवा रक्कम परत केली नाही व सर्वांची एकुण ७,५८,७०६ रुपयाची फसवणुक केली. अशा फिर्यादीचे तोंडी तक्रारीवरुन सदरचा गुन्हा नोंद करुन तपासात घेतला.
सदर प्रकरणाची प्राथमिक चौकशी केली असता यातील आरोपी याने लोकांना सांगीतलेली “आत्मा वनधन जनधन योजना” हि कुठल्याही स्वरुपात शासनाचे संबंधीत दिसुन आली नाही. तसेच आज दिनांक २२/११/२०२१ रोजी पो. स्टे. चिमुर येथे हजर आलेल्या इतर तालुक्यातील नागरीकांनी आरेपीकडुन योजनेच्या अंतर्गत २०% सबसिडीवर विविध साहीत्य देण्याचे आश्वासन देऊन एकुण ७५,९२,१८५ (पंछात्तर लक्ष ब्यानव हजार एकशे पंच्याशी) रुपयाची फसवणुक केल्याची माहिती दिली. तसेच गैरअर्जदाराने अनेक ठिकाणी आत्मा वनधन जनधन योजनेचे सेवा केंद्र सुरु करुन एजन्टच्या मार्फतीने चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, नागपुर जिल्हयातील अनेक लोकांची त्या त्या ठिकाणी जाऊन मोठया रक्कमेची (करोडो रुपयाची) फसवणुक झाल्याचे संशय वर्तविल्या जात आहे.
सदर गुन्हयातील आरोपी प्रभाकर कृष्णाजी सातपैसे रा. वडाळा (पैकु) यास दिनांक २२/११/२१ रोजी अटक करुन न्यायालयासमोर हजर केले असता न्यायाधिशांनी चिमूर यांनी आरोपीचा दिनांक २९/११/२०२१ पावेतो पि.सी.आर. मंजुर केला असुन आरोपीकडे गुन्हयासंबंधाने तपास केल्या जात आहे. सदर गुन्हयाचा पोलीस निरीक्षक मनोज गभने, ठाणेदार पोलीस स्टेशन चिमूर यांचे मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक अलिम शेख, पोलीस नाईक कैलास आलाम, पोलीस अंमलदार राहुल चांदेकर पुढील तपास करीत आहेत.