
प्रतिनिधी नागपूर
नागपूर दि. ८ : महाराष्ट्र विधान परीषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदार संघ निवडणुकीसाठी शुक्रवार 10 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. जिल्हा निवडणूक यंत्रणा यासाठी सज्ज झाली आहे.जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विमला आर. यांनी आज निवडणूक यंत्रणेचा आढावा घेतला. मतदान प्रक्रिया व त्यानंतरच्या व्यवस्थेबाबत उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी त्यांनी बैठक घेऊन चर्चा केली. बचत भवन येथे मतमोजणी होणार आहे.
त्यामुळे मतदान पेट्या बचत भवन येथील स्टॉंगरूम मध्ये ठेवण्यात येणार असल्याने आज पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बचत भवन परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पाहणी केली. या निवडणुकीसाठी नागपूर शहरासह जिल्हयात १५ मतदान केंद्र असून मतदारांची संख्या 560 आहे. यामध्ये महानगरपालिका 155 जिल्हा परिषद 71 व नगरपरिषद आणि नगरपंचायत 334 अशी मतदार संख्या आहे.
या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार चंद्रशेखर कृष्णरावजी बावनकुळे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार रवींद्र प्रभाकर भोयर, अपक्ष उमेदवार मंगेश सुधाकर देशमुख असे तीन उमेदवार रिंगणात आहेत. शुक्रवारी 10 डिसेंबरला मतदान व 14 डिसेंबरला स्थानिक प्राधिकारी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.सर्व मतदान केंद्र तहसील कार्यालयाच्या आसपास असल्यामुळे मतदानाच्या दिवशी १० डिसेंबरला तहसील कार्यालय नागपूर शहर, नागपूर ग्रामीण तहसील कार्यालय, तहसील कार्यालय नरखेड, काटोल, रामटेक, उमरेड, मौदा, पारशिवनी, येथील सेतू केंद्र बंद ठेवली जाणार आहेत नागरिकांनी या प्रक्रियेत सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.