- संविधान उद्देशिकेचे सामुदायिक वाचन
नागपूर, ता. २६ : आपल्या भारतासारख्या विशाल देशामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये विविध धर्माचे असंख्य लोक राहतात. मात्र देशाबाहेर सर्वांची ओळख ही एक भारतीय म्हणूनच पुढे येते ही अभिमानास्पद बाब आहे. भारतीय लोकशाही जगातील सर्वोत्तम लोकशाही आहे, भारतीय संविधानामुळे आपला देश एकसंघ आहे. संविधानामुळे देशाची एकता एकात्मता व अखंडता टिकून आहे, त्यामूळे संविधानाचा सन्मान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, भारतीय संविधानामूळेच देशात समानता नांदत असल्याचे मनोगत मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. यांनी व्यक्त केले.
भारतीय संविधानाबाबत जनजागृती व्हावी व सर्व नागरिकांना संविधानाची ओळख व्हावी यादृष्टीने नागपूर महानगरपालिकेत दरवर्षी “२६ नोव्हेंबर” हा संविधान दिवस म्हणून पाळण्यात येतो. त्या अनुषंगाने म.न.पा. केन्द्रीय कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमध्ये मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी, अतिरिक्त आयुक्त सर्वश्री. राम जोशी व संजय निपाणे यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. त्यानंतर आयुक्तांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. त्यांच्या पाठोपाठ उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांनीसुध्दा संविधान उद्देशिकेचे सामुहिकरित्या वाचन केले.
यावेळी उपायुक्त श्री. निर्भय जैन, उपायुक्त श्री. मिलींद मेश्राम, उपायुक्त व संचालक घनकचरा व्यवस्थापन डॉ. प्रदीप दासरवार, शिक्षणाधिकारी श्रीमती प्रीति मिश्रीकोटकर, अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, सहाय्यक आयुक्त श्री. महेश धामेचा, विधि अधिकारी श्री. व्यंकटेश कपले, मुख्य अग्निशमन अधिकारी (प्रभारी) श्री.बी.पी.चंदनखेडे,अधीक्षक (सा.प्र.वि.) मदन सुभेदार, सहाय्यक अधीक्षक मनोज कर्णिक, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस, ललित राव, बालकृष्ण पलांदुरे, राजेश वासनिक, अग्निशमन विभागाचे केन्द्र अधिकारी राजेन्द्र दुबे, राजेश लोहितकर यांचेसह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.