- ३२२ केंद्रांवर मतदान होणार
- नागपूर शहरात दोन सहाय्यकारी मतदान केंद्राची वाढ
नागपूर, दि.२६ : महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक अंतर्गत नागपूर विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक-२०२० साठी यापूर्वी 320 मतदान केंद्र निश्चित करण्यात आले होते. मतदार यादी प्रसिध्द झाल्यावर मतदाराची वाढलेली संख्या आणि कोरोनाची पार्श्वभूमी पाहता दोन सहाय्यकारी मतदान केंद्राची वाढ करण्यात आली आहे.
यापूर्वी भारत निवडणूक आयोगाने आपल्या २३ तारखेच्या आदेशानुसार नागपूर पदवीधर मतदारसंघांमध्ये एकूण सहा जिल्ह्यांसाठी मतदान केंद्राची अंतिम यादी जाहीर केली होती. यामध्ये ३२० केंद्र निश्चित केले होते. आता ३२२ ठिकाणी मतदान होणार आहेत.
कोरोना संसर्गाच्या पार्श्व्भूमीवर होत असलेल्या नागपूर विभाग नागपूर पदवीधर मतदार संघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी मतदान केंद्रांची अंतिम यादी जाहीर करताना मतदारांच्या सुरक्षा व्यवस्थेकडे अधिक लक्ष देण्यात येत असल्याचे या आदेशात स्पष्ट केले आहे.
कोविड-१९ संदर्भातील सूचनांचे पालन करून हे मतदारसंघ निश्चित करण्यात आले आहे. नव्या यादीनुसार आता नागपूर जिल्हयात २ केंद्र वाढवण्यात आली आहे. यामध्ये सक्करदरा मतदान केंद्र क्रमांक 80 व अयोध्या नगर मतदान केंद्र क्रमांक 104 येथे दोन सहाय्यकारी मतदान केंद्र राहतील.
त्यामुळे जिल्हातील १६२ केंद्राची संख्या १६४ झाली आहे. अन्य जिल्हयातील संख्या कायम आहे. यामध्ये भंडारा जिल्ह्यांमध्ये ३१, गोंदिया जिल्ह्यामध्ये २१, वर्धा जिल्ह्यामध्ये ३५, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ५०, तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये २१ असे एकूण ३२२ मतदान केंद्र असतील, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी दिली आहे.