महापौर दयाशंकर तिवारी यांची आमदार निवास कोव्हिड केअर सेंटरला आकस्मिक भेट
नागपूर, ता. २५ : नागपूर शहराचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी बुधवारी (ता.२४) सिव्हिल लाईन्स येथील आमदार निवास कोव्हिड केअर सेंटरला आकस्मिक भेट दिली.
यावेळी आरोग्य समिती सभापती महेश महाजन, अतिरिक्त सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, नोडल अधिकारी डॉ. गुल्हाने आदी उपस्थित होते.
यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी आमदार निवास येथील कोव्हिड केअर सेंटर च्या स्थितीचा आढावा घेतला. आमदार निवास येथे सध्या १४० खोल्या आहेत यातील प्रत्येक खोलीमध्ये २ याप्रमाणे एकूण २८० गृह विलगिकरणामध्ये घरी राहू न शकलेल्या रुग्णांची व्यवस्था करता येईल. सध्या या सेंटरमध्ये ५५ रुग्ण विलगिकरणामध्ये आहेत. या सर्व रुग्णांना औषध, भोजन, पाणी व अन्य सर्व आवश्यक सुविधा पुरविण्यात येत असल्याची माहिती डॉ. गुल्हाने यांनी यावेळी दिली.
आमदार निवास येथील कोव्हिड केअर सेंटरमध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची योग्य काळजी घेणे ही जबाबदारी आहे. या सर्व रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक सर्व मदत करण्यास मनपा सदैव तत्पर आहे. त्यासंबंधी माहिती मनपाला द्यावी, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी यावेळी केले.