नागपूर दि. ५ एप्रिल
शासनाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी पूरक व पाठपुरावा करणारी यंत्रणा म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्याय योजना नागपूर जिल्ह्यामध्ये राबविण्याचे संकेत ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे दिले.
शासनाच्या विविध योजना व त्याची अंमलबजावणी यासाठी नागपूर जिल्हा अग्रेसर रहावा. सामाजिक न्याय, कौशल्य विकास, कृषी, आरोग्य, शिक्षण आदी क्षेत्रातील वेगवेगळ्या योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी नागपूर जिल्ह्यामध्ये व्हावी. यासाठी एक खिडकी स्वरूपाची नवीन योजना डॉ.पालकमंत्री नितीन राऊत यांच्या पुढाकाराने तयार होत आहे. या योजनेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्याय योजना, असे नाव देण्यात आले आहे.
विभागीय कार्यालयामध्ये आज यासंदर्भात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार अभिजित वंजारी, विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण बाबासाहेब देशमुख, नागपूर सुधार प्रन्यास व महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महानगरपालिका, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय यासोबतच शासनाच्या विविध विभागांच्या लोकोपयोगी योजना, व्यक्तिगत लाभाच्या योजना, सार्वजनिक हिताच्या योजना, कौशल्य विकास, रोजगार निर्मिती, नोकरीच्या संधी शासकीय-निमशासकीय स्थरावर असणाऱ्या रोजगाराच्या संधी आरोग्य शिक्षण तसेच आणीबाणीच्या वेळी उद्भवणार्या परिस्थितीनुरूप येणाऱ्या योजना यासंदर्भात तात्काळ व कालबद्ध पद्धतीने जनतेला लाभ मिळावा.सामान्य नागरिक व प्रशासन यामधील दुवा म्हणून या योजनेने काम करावे, असे प्राथमिक स्वरूप या योजनेचे असून यासंदर्भात अनेक तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. पुढील आठवड्यामध्ये यासंदर्भातील मसुदा अंतिम केला जाणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. तत्पूर्वी सर्व विभाग प्रमुखांनी यामध्ये आपले मत नोंदवावे व सूचना द्याव्यात, अशी सूचना पालकमंत्री यांनी आज केली.