Breaking News

कचरा विल्हेवाटी संदर्भात योग्य नियोजन करा – महापौर दयाशंकर तिवारी

महापौरांनी केली लक्ष्मीनगर झोनमधील कचरा समस्येची पाहणी

नागपूर, ता. २० : नागरिकांच्या घरांमधून संकलित करण्यात आलेला कचरा ट्रान्सफर स्टेशनवर जास्तवेळ राहिल्यास त्यातून दुर्गंध पसरते त्यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होतो. संकलित करण्यात आलेल्या कच-याची वैज्ञानिक पद्धतीने सिमीत कालावधीमध्ये विल्हेवाट लावली जावी यासाठी योग्य नियोजन करा, असे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले. लक्ष्मीनगर झोनमधील कचरा ट्रान्सफर स्टेशनवरील समस्येसंदर्भात महापौर दयाशंकर तिवारी यांनी बुधवारी (ता.२०) पाहणी दौरा केला. यावेळी लक्ष्मीनगर झोन सभापती पल्लवी शामकुळे, उपायुक्त राजेश भगत, स्वच्छता नोडल अधिकारी डॉ.गजेंद्र महल्ले, झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड, झोनल अधिकारी रामभाउ तिडके आदी उपस्थित होते.

लक्ष्मीनगर झोनमधील खामला ते जयताळा मार्गावरील कचरा ट्रान्सफर स्टेशन त्याच मैदानाच्या मागील बाजूस साकार नगर मैदानात स्थलांतरीत करण्यात आले. या दोन्ही स्थळांची महापौरांनी पाहणी केली. आधीचे खामला ते जयताळा मार्गावरील ट्रान्सफर स्टेशनमुळे परिसरात दुर्गंधी असायची शिवाय येथे डुकरांचा वावर असल्याने रस्त्यावर अपघाताच्या सुद्धा घटना घडल्या. परिसरात योग्य नियोजनाचा अभाव आणि कचरा संकलन करणा-या कंपनीकडून राहिलेल्या त्रुट्यांमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाबद्दल संबंधित स्वच्छता निरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावून संबंधित कंपनीला दंड ठोठावण्याचे निर्देशही महापौरांनी दिले.

घराघरातून संकलित करण्यात आलेला कचरा, कचरा ट्रान्सफर स्टेशनवर जमा केला जातो. यानंतर मोठ्या टिप्परच्या सहायाने तो भांडेवाडी डम्पिंगयार्डमध्ये नेण्यात येतो. मात्र डम्पिंग यार्डमध्ये नेण्यापूर्वी ओला कचरा जमिनीवर टाकला जात असल्याने त्यातून दुर्गंधी पसरते. दुर्गंध पसरू नये व कच-याची योग्य विल्हेवाट लावली जावी यासाठी ट्रान्सफर स्टेशनच्या जागेचे समतलीकरण करून त्यावर सिमेंट क्राँक्रीटकरण केले जावे. त्यामुळे कच-यामधून दुर्गंध उठणार नाही शिवाय ट्रान्सफर स्टेशनवर स्वच्छता ठेवणेही सोयीचे होईल, असे सांगतानाच यादृष्टीने तातडीने नियोजन करण्याचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी निर्देशित केले.

उघड्यावर कचरा टाकणा-यांवर कॅमे-याची नजर मोकळे भूखंड आणि खुल्या जागेमध्ये कचरा टाकून शहर विद्रुप करणा-यांवर आता कठोर कारवाई करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे. खुल्या जागेमध्ये कचरा टाकणा-यांवर लक्ष रहावे व त्यांच्यावर कारवाई केली जावी, यासाठी मनपातर्फे कॅमेरे लावण्यात येणार आहेत. यासंबंधी सदर दौ-यातील पाहणीदरम्यान महापौरांनी सूचना केली. रिंग रोडवरील पडोळे हॉस्पीटल चौकामध्ये मोठे भूखंड मोकळे आहे.

तिथे नागरिकांकडून कचरा टाकण्यात येत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. मुख्य मार्गाच्या लगत कचरा टाकला जात असल्याने नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता संबंधित नागरिकांवर वचक बसणे आवश्यक आहे. यादृष्टीने कारवाई केली जावी यासाठी या भूखंडावर कॅमेरे लावण्यात येणार आहेत. त्यामुळे येथे कचरा टाकणा-यांचे फोटो काढले जातील व त्यांच्यावर कारवाई केली जाईल. याशिवाय सदर भूखंडाची संपूर्ण स्वच्छता व समतलीकरण करून आलेल्या खर्चाची रक्कम संबंधित भूखंड मालकाकडून कर स्वरूपात वसूल करण्यात यावे. कर न भरण्यात आल्यास नियमानुसार भूखंडाचे लिलाव करण्याचेही सक्त निर्देश महापौरांनी यावेळी दिले.

दीनदयाल नगर परिसरातील रहिवासी निवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी व्ही.एल. उपाध्ये यांनी महापौरांकडे यावेळी समस्या मांडली. दीनदयाल नगर येथे प्राथमिक शाळेच्या आरक्षित जागेवर मनपाद्वारे सुरक्षा भिंतीचे बांधकाम करण्यात आले. या ठिकाणी झाडे व कचरा वाढल्याने परिसरात साप आणि अन्य श्वापदांचा धोका असल्याची त्यांनी समस्या मांडली. यासंदर्भात महापौरांच्या निर्देशावर सहायक आयुक्त गणेश राठोड यांनी सदर परिसराची पाहणी केली व तात्काळ सदर आरक्षित जागेची स्वच्छता करण्याचे विभागाला सूचित केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

रत्नापुर ग्रामपंचायत येथे अवडज वाहतुकीच्या नावावर अवैध वसुलीचा धंदा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर:-सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथुन जवळच असलेल्या रत्नापुर ग्रामपंचायत येथे अवजड वाहतुकीच्या नावाखाली …

वाढतोय उष्माघाताचा धोका, खबरदारी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा वाढत असून तापमान सातत्याने वाढत आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved