खातेदार शेतकरी व कुटुंबातील एका सदस्यास लाभ
बुलडाणा, दि. 23 : अपघातग्रस्त शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस आर्थिक लाभ देण्याकरिता गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यात येते. सन 2019-20 मध्ये या योजनेची व्याप्ती वाढवून योजनेमध्ये सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व शेतकऱ्यांच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेल्या कोणत्याही एका सदस्यासह, कुटुंबातील 10 ते 75 वर्षे वयोगटातील एकूण दोन जणांना गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या लाभ देण्यात येणार असल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांनी दिली.
या योजनेनुसार खातेदार शेतकऱ्यांकरिता शासन स्वत: विमा हप्ता भरणार असून अपघातग्रस्त कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता सुमारे 19 लाख 13 हजार वहिती खातेदार शेतकरी व वहिती खातेदार म्हणून नोंद नसलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयातील सुमारे 38 लाख 26 हजार लाभार्थ्यांच्या या योजनेत समावेश करण्यात आला आहे. या योजनेच्या अधिक माहिती करिता जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे विभागीय कृषि सहसंचालक सुभाष नागरे यांनी कळविले आहे.