
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर दि. 16 डिसेंबर : चंद्रपूर व गडचिरोली जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात कार्यक्षेत्रातील नोंदीत मुख्य मालकांना (कारखाने, आस्थापना इत्यादी) मागणीनुसार सुरक्षारक्षक पुरविण्याकरीता 500 सुरक्षा रक्षकांचा समुच्चय पूल तयार करण्यात येत आहे. याकरिता सहायक कामगार आयुक्त कार्यालयाकडून दि. 15 ते 30 जानेवारी 2021 या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त अर्जावर कोविड काळात निर्बंध असल्यामूळे कार्यवाही करणे शक्य झाले नाही. त्यामुळे दि. 7 डिसेंबरपासून उमेदवारांचे मुळ कागदपत्रे तपासणीची कार्यवाही पार पाडण्यात येत आहे. भरती प्रक्रियेचा प्रथम टप्पा कागदपत्रे तपासणी असून एकूण प्राप्त झालेल्या 4005 अर्जावर, रोज 500 उमेदवारांना मोबाईल संदेश व दूरध्वनीद्वारे संपर्क साधून बोलाविण्यात आले आहे.
भरती प्रक्रियेच्या दुसरा टप्प्यात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत शारीरिक पात्रता व मैदानी परीक्षा घेण्यात येईल. तदनंतर जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून वैद्यकीय प्रमाणपत्र व पोलीस विभागाकडून प्राप्त चारित्र पडताळणी प्रमाणपत्राच्या आधारे पात्र सुरक्षा रक्षकांची गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार आहे. ही गुणवत्ता यादी शासनास सादर करून शासन मान्यतेनंतर 500 सुरक्षारक्षकांचा गुणवत्ता यादीनुसार संकोष पूल तयार करण्यात येईल. संकोष पुल तयार करणे हे थेट भरती नाही. त्यामुळे, गुणवत्ता यादीत पात्र झालेल्या सुरक्षारक्षकांना नोकरीची हमी देता येणार नाही. मात्र, ज्या प्रमाणात आस्थापनांकडून मागणी उपलब्ध होईल त्यानुसार त्यांना कारखाने आस्थापना, खाजगी व शासकीय कार्यालयात सेवेसाठी वितरित केले जाईल.
सदर प्रक्रिया पारदर्शक संगणकीकृत निपक्षपातीपणे होणार असून, उमेदवारांनी त्रयस्थ व्यक्तीच्या कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये किंवा संपर्क करू नये. कोणतीही व्यक्ती पैशाची मागणी करीत असल्यास सदर व्यक्तीची प्राधिकरणाकडे तक्रार करावी, असे आवाहन चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष तथा सहाय्यक कामगार आयुक्त श्रीमती भोईटे यांनी केले आहे.