
विषेश – प्रतिनिधी
मुंबई :- कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने पुन्हा राज्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आलेले आहे. लग्नासाठी किंवा इतर कोणत्याही समारंभात फक्त ५० जणांनाच परवानगी असणार आहे. तसेच रुग्णांची संख्या वाढत असणारे जिल्हे किंवा महापालिका हद्दीत निर्बंध कठोर करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला बहाल करण्यात आले आहेत.
मावळत्या वर्षांला निरोप आणि नववर्षांच्या स्वागतासाठी मुंबईसह विविध शहरे किंवा पर्यटनस्थळी किंवा समुद्रकिनाऱ्यांवर होणारी गर्दी लक्षात घेता ही सर्व स्थळे बंद केली जाणार आहेत.राज्यात दोन दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत दुपटीपेक्षा अधिक वाढ झाली.
शिवाय ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून, या विषाणूच्या संसर्गामुळे एकाचा मृत्यूही झाला. या पार्श्वभूमीवर निर्बंध लादण्याशिवाय पर्याय नसल्याचे सरकारचे मत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाविषयक तज्ज्ञ समितीच्या सदस्यांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर निर्बंध अधिक कठोर करण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भातील आदेश रात्री उशिरा जारी करण्यात आला. हे सर्व निर्बंध शुक्रवारी मध्यरात्रीपासून अमलात येतील.
बैठकीस आरोग्य मंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव देवाशीष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल, करोना कृती दलाचे डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. अजित देसाई, डॉ. राहुल पंडित उपस्थित होते. सध्या तरी गर्दी कमी करण्यावर भर देण्यात आला आहे.