Breaking News

महिलांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा -अतिरिक्त जिल्हाधिकारी

कोविड काळात महिला व बालविकास विभागाचे काम उत्तम

कर्ता व्यक्ती गमाविलेल्या कुटुंबांना महिला दिनी धनादेश वितरण

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर दि. 8 मार्च : कोविडच्या महामारीने अनेक कुटुंबाचे अर्थचक्र बदलून गेले आहे. त्यातच घरातील कर्ता व्यक्ती गमाविलेल्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून त्याची भरपाई कोणीच करू शकत नाही. मात्र आता भविष्याकडे पाहण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे दु:खाच्या या परिस्थितीतही महिलांना लढायचेच आहे. शासन-प्रशासन महिलांच्या पाठीशी असून महिलांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी केले.

महिला व बालविकास विभाग, विधीसेवा प्राधिकरण आणि सह्याद्री फाऊंडेशन नागपूर यांच्यावतीने सरस्वती स्वाधार गृह येथे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर डॉ. जयश्री कापसे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत, महिला सेलच्या पोलिस निरीक्षक अश्विनी वाकडे, अधिवक्ता बी.एल. दिवसे, सह्याद्री फाऊंडेशनचे श्री. क्षीरसागर आणि बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर आदी उपस्थित होते.

एका विषाणुने मानवी जीवनाची उलथापालथ केली आहे, असे सांगून श्रीमती वरखेडकर म्हणाल्या, सध्या आपण कठीण प्रसंगातून जात आहोत. कोरोनामुळे ज्या व्यक्ती आपल्यातून निघुन गेल्या, त्याची नुकसानभरपाई होऊ शकत नाही. अशा परिस्थतीत सर्वांना जिद्दीने लढायचे आहे. महिलांना तर आता अधिक जबाबदा-या निभवाव्या लागणार आहेत. महिलांमध्ये अंतर्गत एक आदिशक्ती असते. त्यामुळे अशा कठीण परिस्थितीत समोर जातांना किंवा मार्ग निवडतांना प्रशासन आपल्या सोबत आहे.

पुढे त्या म्हणाल्या, सह्याद्री फाऊंडेशनतर्फे ज्या कुटुंबांना आर्थिक धनादेश मिळाले आहेत, त्यांनी त्याचा योग्य वापर करावा. महिलांसाठी शासनाच्या विविध विभागांच्या योजना आहेत. त्याची माहिती घेऊन संबंधितांनी लाभ घ्यावा. शासनाची मदत पोहचविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. कोविड काळात महिला व बालविकास विभागाने अतिशय उत्तम काम केले. एक किंवा दोन पालक गमाविलेल्या बालकांची प्रत्यक्ष भेट घेऊन अशा मुलांचे प्रश्न, त्यांची मालमत्ता, कुटुंबाचे प्रश्न आदींसाठी महिला व बालविकास विभागाने संवेदनशीलपणे काम केले आहे, अशी कौतुकाची थाप त्यांनी दिली.

डॉ. जयश्री कापसे म्हणाल्या, महिला दिन हा आपले हक्क मागण्याचा दिवस आहे. या माध्यमातून महिलांचे हक्क, अधिकार, कायदे, आदींबाबत मार्गदर्शन व्हावे. तसेच सह्याद्री फाऊंडेशनने कर्ता व्यक्ती गमाविलेल्या कुटुंबांना धनादेश देऊन सामाजिक उत्तरदायित्व सिध्द केले आहे. आपल्यापेक्षा इतरांचा विचार करणारी ही संघटना आहे. तर अधिवक्ता दिवसे म्हणाले, महिलांचे कोणतेही कायदे, अधिकार, हक्क, कौटुंबिक समस्या आदींबाबत मार्गदर्शन घेण्यासाठी जिल्हा सत्र न्यायालय, चंद्रपूर येथे विधीसेवा प्राधिकरणसोबत संपर्क करावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी सह्याद्री फाऊंडेशनच्यावतीने कर्ता व्यक्ती गमाविलेल्या कुटुंबातील माधुरी चित्तोडवार, रेशमा पांडे, सुमन फुलकर, प्राजक्ता सरोदे, मंदा मेश्राम, आशा पाटील, स्वाती चव्हाण, निलिमा दीक्षित, किरण देवगडे यांच्यासह एकूण 50 महिलांना प्रत्येकी 30 हजार रुपयांचा धनादेश वितरीत करण्यात आला. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत यांनी तर संचालन रानी येनेकर यांनी केले. कार्यक्रमाला सरस्वती स्वाधार गृहाचे व्यवस्थापक घनश्याम कामटकर यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

पोलिसांनी पकडले रात्रीच्या अंधारात रेतीने भरलेला ट्रॅक्टर

रेती माफियांना आशिर्वाद कुणाचा? महसूल अधिकारी कोमात का? जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चिमूर : – चिमूर …

अवैध रेती उपसा व मुरूम उत्खनन करणाऱ्यांची चौकशी करून तात्काळ कारवाई करा

गजानन बुटके यांचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:-चिमूर तालुक्यात नदी पात्रातील मोठ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved