
वाहतूक समस्येसंदर्भात आक्षेप व सूचना असल्यास कळविण्याचे आवाहन
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर, दि. 29 ऑगस्ट : घुग्गूस शहरातील रेल्वे ओव्हर ब्रिजचे काम चालू असून शहरातून जाणाऱ्या जड वाहनांमुळे वाहतूक समस्या निर्माण होत आहे. वाहतूक समस्येवर आळा घालण्यासाठी घुग्गूस शहरात जड वाहनांना वाहतूक बंदी व पर्यायी मार्गाचा अवलंब करण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे.
मुंबई पोलिस अधिनियम 1951 च्या कलम 33 (1)(ब) नुसार सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर रहदारीचे करावयाच्या नियमानासाठी प्राप्त असलेल्या कायदेशीर अधिकारान्वये, घुग्गूस शहरातून जाणाऱ्या जड वाहनांच्या वाहतुकीमुळे वाहतूक समस्या निर्माण होऊन रहदारीला अडथळा निर्माण होऊ नये, जनतेस त्रास होऊ नये, त्यांची गैरसोय होऊ नये व अपघातासारखे प्रकार घडून जीवित किंवा वित्तहानी होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे.
शहरात जड वाहनांना वाहतूक बंदी :
घुग्गूस बसस्थानक ते म्हातारदेवीपर्यंत जड वाहतुकीस बंद राहील. घुग्गूस बसस्थानक ते राजीव रतन हॉस्पिटल-बेलोरा ओवर ब्रिजमार्गे वणीकडे जाणारा रस्ता जड वाहतुकीस बंद राहील.
असे असेल पर्यायी मार्ग :
वणीकडून, घुग्गूसकडे येणारी जड वाहतूक राजीव रतन हॉस्पिटलपर्यंत येऊ शकेल. वणीकडून घुग्गूस बसस्थानकाकडे जाण्यासाठी पाटाळा-कोंडा फाटा किंवा पाटाळा-वरोरा-भद्रावती-ताडाली-पडोली घुग्गूस या मार्गाचा अवलंब करावा. तसेच घुग्गूसकडून वणी जाण्याकरीता पडोली-भद्रावती-वरोरा मार्गांचा अवलंब करावा.
यासंदर्भात घुग्गूस येथील वाहतुकीमध्ये बदल करून घुग्गूस शहरातील वाहतूक समस्या सोडविण्याकरीता जनतेकडून संयुक्तिक सूचना व आक्षेप मागविण्यात येत आहे. याबाबत काही आक्षेप व सूचना असल्यास दि. 31 ऑगस्ट 2022 पर्यंत लेखी स्वरुपात कार्यालयास कळविण्यात यावे. अन्यथा या प्रस्तावित मार्गावरील नियमित असलेली जड वाहतूक वर नमूद वेळेत बंद करण्याचे घोषित करण्यासाठी सर्व संबंधितांची संमती आहे, असे गृहीत धरून रितसर अधिसूचना निर्गमित करण्यात येईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी कळविले आहे.