
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-आज दिनांक २५/११/२०२२ ला आठवले समाजकार्य महाविद्यालय, चिमूर येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (अभ्यास केंद्र कोड – 4259 – A) केंद्रात प्रथम वर्षाला प्रवेशित विद्यार्थ्यांच्या परिचय व स्वागताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमांना अभिवादन करून करण्यात आली. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून य चं म मु विद्यापीठाचे अभ्यास केंद्र संयोजक प्रा. डॉ. सुनील झाडे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. विलास पेटकर उपस्थित होते. शास्त्रशुद्ध संप्रेषणाचा व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून,
दूरशिक्षण पद्धतीने तांत्रिक, व्यावसायिक, रोजगाराभिमुख व जीवनोपयोगी शिक्षण देण्यासाठी नाविन्यपूर्ण व लवचिक दूरशिक्षण पद्धती विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेऊन महाराष्ट्र शासनाने यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने मुक्त विद्यापीठाची स्थापना केल्याचे प्रा. डॉ. विलास पेटकर यांनी याप्रसंगी सांगितले. य चं म मु विद्यापीठ हे अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणारे महाराष्ट्रातील विद्यापीठ आहे.
महाराष्ट्रातील इतर विद्यापीठांसाठी हे विद्यापीठ प्रेरणादायी ठरले आहे. प्रत्यक्ष कॉलेजमधल्या वर्गात न बसता बाहेरून शिकता यावे अशी सोय असलेले, ‘ ज्ञानगंगा घरोघरी ‘ हे ब्रीद असलेले यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ असल्याचे प्रा.डॉ.सुनील झाडे यांनी अध्यक्षीय मार्गदर्शनातून सांगितले.याप्रसंगी बी. ए., बी. कॉम. व मानवी हक्क प्रमाणपत्र या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा परिचय करून घेऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत यांनी तर आभार केंद्र सहाय्यक दिपक गोपाले यांनी मानले.