
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित
प्रतिनिधी जगदीश का. काशिकर
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मुंबई: मुंबईतील अंधेरी मरोळ येथील ‘अलजमीया – तुस – सफीया’ या अरेबिक शैक्षणिक संस्थेचे उद्घाटन आज (शुक्रवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते.
देशातील युवा पिढीला पुढे नेणारी धोरणे शासनाकडून राबवली जात आहेत. कोणत्याही समाज घटकातील विद्यार्थी शिक्षणात मागे पडू नये यासाठी शिक्षण धोरणात बदल करून मातृभाषेतून शिक्षणाला महत्व दिले जात आहे. ‘दाउदी बोहरा’ हा समाज आज काळाप्रमाणे बदलत असून नावीन्यपूर्ण शिक्षणाची वाट धरत आहे, ही गोष्ट आनंदाची आहे. अलजमीया – तूय- सफीयाह ही देशातील दुसरी अरेबिक शैक्षणिक संस्था असून या समाजाचे १५० वर्षांपूर्वीचे स्वप्न साकार झाल्याचा आनंद वाटतो, असे मत याप्रसंगी पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी बोलताना व्यक्त केले.
गुजरात सुरत येथील संस्थेचे माजी कुलपती डॉ.मोहम्मद बुरहानुद्दीन यांचे काम मी पाहिले आहे. नव्या पिढीला शिक्षण देण्यासाठी ते आग्रही होते. सुरत येथे त्यांनी कुपोषण आणि जलसाक्षरता साठी काम केले त्यांची सक्रियता ही ऊर्जा देणारी होती. आजही या समाजाच्या आजच्या पिढीकडून आपल्याला प्रेम मिळत आहे. हे प्रेम खूप मोलाचे आहे असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासमयी बोलताना सांगितले.
याप्रसंगी विधानसभेचे अध्यक्ष ऍड.राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, “अलजमीया- तुस – सफीया चे “कुलगुरू डॉ. सय्यदन मुफद्दल सैफउद्दीन, दाउदी बोहरा समाजाचे शहजादा अलिअसगर कलीमऊद्दीन, शहजादा कियदजोहर इज इज्जुद्दीन, दाउदी बोहरा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.