
चौदा गावातली शेतकरी कीर्तन महोत्सव
तालुका प्रतिनिधी-अविनाश देशमुख -शेवगांव
शेवगांव:- हरिनाम सप्ताह म्हटले की लाखोंच्या देणग्या, चमचमीत, चटपटीत, गोडधोड पदार्थांनी भरलेल्या ताटाच्या पंगती आणि विनोदाचार्य महाराज यांना भल्ली मोठी बिदागी देऊन केलेले फक्कड मनोरंजन. वैचारिक चिंतनापेक्षा टुखार विनोदांचा भिकार भडीमार, असे हरिनाम सप्ताहाला स्वरूप आलेले असताना अत्यंत कमी खर्चातही संत विचारवर आधारित उच्च प्रतिची वैचारिक शिदोरी देणारा आदर्श कीर्तन महोत्सव धारुर-परळी वैजनाथ तालुक्यातील चौदा गावांनी मिळून आयोजित केला आहे. या चौदा गावांसह आजूबाजूच्या सर्व गावात या कीर्तन महोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून शुक्रवार 3 मार्च पासून धारुर तालुक्यातील कान्नापूर येथे या कीर्तन महोत्सवाचा प्रारंभ होत आहे.
जगद्गुरु तुकाराम महाराज बीजेच्या निमित्ताने संत विचारांचे वैचारिक मंथन व्हावे यासाठी परळी वैजनाथ-धारुर तालुक्यातील चौदा गावांनी एकत्र येऊन भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे. सध्या हरिनाम सप्ताहाला येत असलेले इव्हेंटचे स्वरूप टाळून आदर्श प्रबोधन पर्व ठरेल, असा प्रयत्न संयोजकांनी केला आहे.या सप्ताहात अन्नदान असेल मात्र त्याचा भपकेबाज देखावा नसेल. चौदा गावातून भाकरी गोळा केल्या जातील. सकाळी एका गावातील आणि संध्याकाळी एका गावातील घराघरातून भाकरी गोळा करून दररोजच्या पंगती केल्या जातील. कीर्तन महोत्सव ठिकाणी पिठलं किंवा एखादी भाजी बनविली जाईल. अत्यंत साधी पंगत होईल.या कीर्तन महोत्सवातील इतर भपकेबाजपणा कमी करून उच्च प्रतिचे प्रबोधन होईल याची काळजी संयोजकांनी घेतली आहे. या महोत्सवात हजारोंची बोली लावून मानधन ठरविणा-या एकाही विनोदाचार्य महाराजांना निमंत्रित करण्यात आलेले नाही. तर संत साहित्याचा अभ्यास करून त्या आधारे समाजात शांतता, एकोपा, अंधश्रद्धा निर्मूलन यावर प्रबोधन करणारे कीर्तनकार आणि वक्त्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
यातील एकाही वक्त्याने आपले मानधन सांगितलेले नाही. संयोजक प्रवासातील अंतर लक्षात घेऊन मानधन देतील त्याचा स्वीकार करण्याचे या कीर्तनकारांनी मान्य केले आहे.कीर्तनकारामध्ये संत तुकाराम महाराज यांच्या साहित्याचा गाढा अभ्यास असणारे विजय महाराज गवळी, नामदेव-तुकाराम वारकरी परिषदेच्या माध्यमांतून सामाजिक ऐक्यासाठी प्रसिद्ध असणारे मधुकर महाराज बारुळकर, संत श्री बंकट स्वामी महाराज यांच्या आदर्श वारकरी परंपरेचा वारसा चालविणारे नाना महाराज कदम, सुफी आणि वारकरी संत परंपरेचा सुरेख संगम साधून धार्मिक सलोखा निर्माण करणारे जलाल महाराज सय्यद, वारकरी संतांच्या विवेकी विचारांच्या आधारे अंधश्रद्धा निर्मूलन, स्री सक्षमीकरण याबाबत प्रबोधन करणारे ज्ञानेश्वर महाराज वाबळे, अत्यंत कमी वयात संत साहित्याचा गाढा अभ्यास करून विवेकी समाज निर्मितीची वाट प्रशस्त करणारे ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांची कीर्तने होणार आहेत.
शेतक-यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यापासून ते संविधान जागरापर्यंत विविध उपक्रम राबविणारे शामसुंदर महाराज सोन्नर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. कीर्तनाबरोबर प्रवचनासाठी उत्कृष्ट वक्त्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. ज्यात वारकरी दर्पणचे संपादक सचिन पवार, मूलनिवासी वारकरी महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष रामेश्वर त्रिमुखे, पंचफूला प्रकाशनचे संपादक, विचावंत डाॅ. बालाजी जाधव, श्री संत कैकाडी महाराज यांचे वंशज, मठाधिपती भारत महाराज जाधव, श्रीकृष्ण महाराज उबाळे आणि विकास महाराज लवांडे यांचा समावेश आहे.हरिनाम सप्ताहातील भपकेबाजपणा वाढत असताना आदर्श आयोजनातून वैचारिक प्रबोधनाची परंपरा पुनर्जिवीत व्हावी यासाठी हा प्रयत्न असल्याचे कीर्तन महोत्सवाचे समन्वयक ऍड. अजय बुरांडे यांनी सांगितले.
*- शामसुंदर महाराज सोन्नर*