
जिल्हा प्रशासनाची यशस्वी शिष्टाई ; जप्त केलेले ऑटो परत करणार
नागपूर दि.16 : कोरोना संक्रमण काळामध्ये नागपूर शहर व ग्रामीण भागातील कर्ज काढून घेतलेल्या ऑटोंची जप्ती जिल्हा प्रशासनाच्या हस्तक्षेपाने थांबविण्यात आली आहे. फायनान्स कंपन्यांनी जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या विनंतीला मान्य करत ऑटो चालकांनी सुलभ हप्त्यामध्ये परतफेड करण्याच्या तोडग्याला मान्यता दिली आहे.
नागपूर शहर व ग्रामीण भागातील शेकडो ऑटो विविध फायनान्स कंपन्यांनकडून कर्ज घेऊन रस्त्यावर धावत आहेत. मात्र कोरोना काळामध्ये सुरू असलेला लॉक डाऊनमुळे अनेकांकडे थकीत हप्ते भरण्याची ऐपत उरली नाही. दुसरीकडे फायनान्स कंपन्यांकडून तगादा असल्याने शहरातील अनेक ऑटो चालकांचे ऑटो जप्त करणे सुरू झाले होते. या संदर्भात विदर्भ ऑटो रिक्शा चालक फेडरेशन यांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती.
ऑटो युनियन व जिल्हा प्रशासनाने काल व आज या संदर्भात वेगवेगळ्या ऑटो संघटनांसोबत, चालकांसोबत, थकबाकीदारांसोबत बैठका घेतल्या. काल वनामती येथे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी यासंदर्भात ऑटो युनियन व फायनान्स कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत प्राथमिक बैठक घेतली होती. त्यानंतर यासंदर्भात तडजोडीच्या मुद्द्यांवर आज विविध ऑटो संघटनांसोबत चर्चा करण्यात आली.
शुक्रवारी सायंकाळी यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीत सर्वमान्य तोडगा काढण्यात आला. त्यामुळे पुढील काही दिवस वित्तपुरवठा संस्था आटो जप्ती करणार नाहीत, असे ठरले.
सोबतच ज्या आटो चालकांनी वित्त संस्थांकडून कर्ज घेतले आहे, त्यांनी कर्ज हप्त्याची परतफेड नियमितपणे करावी. जमेल तेवढी रक्कम जमा करावी, दररोज किमान ५० ते १०० रुपये इतक्या कमीतकमी हप्त्यामध्ये परतफेड स्वीकारण्यास वित्तीय संस्थांनी मान्यता दिली आहे.
कोरोना काळामध्ये कोणताही व्यवसाय नसताना अनेक जण हप्ता भरू शकले नाही. मात्र त्यापूर्वीच्या काळामध्ये जे ऑटोचालक नियमितपणे हप्ता भरत होते. त्यांचा यापूर्वीचा हप्ता भरण्याचा अहवाल बघून माणुसकीच्या नात्यातून त्यांची जप्ती थांबविण्याचे देखील वित्तीय संस्थांनी मान्य केले आहे. यावेळी कोरोना कालावधीमध्ये ज्यांचे ऑटो जप्त करण्यात आलेले त्यांचे ऑटो देखील परत करण्यात यावे, असे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहे. मात्र यासोबतच अशा ऑटो चालकांनी नियमितपणे सुलभ हप्त्यात भरपाई करावी असेही सूचित करण्यात आले आहे.
यासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त सभेमध्ये ऑटो युनियन व वित्तपुरवठा संस्था यांनी जिल्हाधिकारी यांनी सुचविलेल्या तोडग्याला मान्यता दिली. यासंदर्भात झालेल्या बैठकीला जिल्हाधिकारी यांच्यासह विदर्भ आटो रिक्षा चालक फेडरेशनचे अध्यक्ष विलास भालेकर, राजू इंगळे, प्रिन्स इंगोले, प्रकाश साखरे, रवी सुखदेवे, सय्यद रिजवान, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
तर वित्त संस्थेमार्फत बजाज वित्त संस्थेचे राकेश कोंडेवार, अखीलेश त्रिपाठी, प्रशील डायजोडे, आशीर्वाद मायक्रो वित्त लिमिटेडचे सिद्धार्थ भवरे, तुषार खाडे आदींची या बैठकीला उपस्थिती होती.