Breaking News

नियमभंग करणाऱ्या दुकानांवर होणार कडक कारवाई

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांचे आदेश

  • गर्दी टाळण्याचे नागरिकांना आवाहन

नागपूर, ता. ९ : ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत नागरिकांना शिथिलता देण्यात आली आहे. शासनाच्या दिशानिर्देशानुसार सर्व नियमांचे पालन करण्याचे नागरिकांना तसेच दुकानदारांना वेळोवेळी आवाहन करण्यात येत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी शहरातील बाजारपेठेमध्ये नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. शासनाच्या दिशानिर्देशांकडे दुर्लक्ष करून नियमभंग करणाऱ्या दुकानदारांवर सक्तीने कारवाई करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. यांनी मनपा आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले आहेत. शहरातील बाजारांमध्ये पुढे गर्दी होऊ नये यासाठी नागपुरातील काही बाजारपेठांना ‘व्हेईकल फ्री झोन’ करण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी मनपा, वाहतूक पोलिस गर्दीवर नियंत्रण आणण्यासंदर्भात समन्वयाने कार्य करणार आहेत.

सोमवारी (ता.९) मनपा मुख्यालयातील आयुक्त सभा कक्षात झालेल्या बैठकीत पोलिस उपायुक्त (वाहतूक) श्री. सारंग आवाड, मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी, श्री. संजय निपाणे, उपायुक्त श्री.निर्भय जैन, श्री.मिलींद मेश्राम, श्री. महेश मोरोणे, श्री. प्रकाश वराडे, संचालक घनकचरा व्यवस्थापन डॉ. प्रदीप दासरवार, सहायक आयुक्त श्री. अशोक पाटील, श्री. विजय हुमणे, बर्डीचे ज्येष्ठ पोलिस निरीक्षक अतुल सबनिस आदी बैठकीत उपस्थित होते.

बैठकीत सीताबर्डी शॉप असोसिएशनचे प्रतिनिधी तसेच हॉकर्सच्या प्रतिनिधींना सुद्धा सामाजिक अंतर ठेवणे, मास्कचा वापर करणे आणि सॅनीटायजरचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यांनी नियमांचे पालन न केल्यास त्यांच्या विरुध्द कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व सहायक आयुक्तांनी बाजारपेठेत जाऊन गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी उपाय करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणे तसेच नियमांचे पालन न करणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याचेही आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

पाच दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणाच्या खरेदीसाठी रविवारी (ता.८) नागपूरच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी होती. शहरात रोजच विविध बाजारांमध्ये अशी गर्दी दिसत आहे. सीताबर्डी, गांधीबाग, इतवारी, महाल, गोकुलपेठ, जरीपटका आणि इतर बाजारपेठेत नागरिकांची होणारी गर्दी ही कोरोनाचा प्रार्दूभाव वाढविण्यास कारणीभूत ठरू शकते. राज्य शासनाने तसेच नागपूर महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना त्रिस्तरीय फेस मास्क चा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे, वेळोवेळी परिसर सॅनिटाईज करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तरीसुद्धा आदेशाचे गांभीर्याने पालन होत नसल्याने मनपा आयुक्तांनी दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.

दुकानदारांकडून नियमांचे योग्य पालन होत नसल्यामुळे संबधित दुकानदारांकडून दंड आकारण्यात येईल. दुकानदाराने पहिल्यांदाच निर्देशाचे उल्लंघन केल्यास ५ हजार रूपये, दुसऱ्यांदा निर्देशाचे उल्लंघन केल्यास ८ हजार रूपये आणि तिसऱ्यांदा निर्देशाचे उल्लंघन केल्यास १० हजार रूपये दंड वसूल करण्याचे निर्देशित करण्यात आले आहे. यासोबत उपरोक्त नमूद दंडात्मक तरतूदी व्यतिरिक्त आवश्यकतेनुसार नियमभंग करणारे सर्व संबंधित दुकानदार, आस्थापना मालक हे फौजदारी गुन्हा दाखल करणे तसेच परवाना रद्द करणे/दुकान बंद करणे या सारख्या कारवाईस पात्र राहतील, असेही मनपा आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

या आदेशाची अंमलबजावणी व दंडात्मक कारवाई करण्यास्तव नागपूर महानगरपालिकेचे उपद्रव शोध व निर्मूलन पथकातील कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक, मुख्य स्वच्छता अधिकारी व संबंधित झोनचे सहायक आयुक्त तथा त्यांच्यापेक्षा वरीष्ठ दर्जाचे महानगरपालिकेचे सर्व संबंधित अधिकारी, सर्व संबंधित पोलिस उपनिरीक्षक व त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचे पोलिस अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.

गर्दीच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त

सदर आदेशाच्या अंमलबजावणी संदर्भात मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. यांनी नागपूर शहर पोलिस आयुक्त श्री.अमितेष कुमार यांना पत्र दिले आहे. त्यानुसार मुख्य बाजाराच्या ठिकाणी गर्दी होणार नाही व कोव्हिड विषयांकीत सुचनांचे काटेकोरपणे पालन केले जावे यासाठी गर्दीच्या बाजारात पुरेसे अतिरिक्त पोलिस तैनात करणे, वाहनांसाठी संबंधित रोड किंवा भाग प्रवेशबंद करून पर्यायी मार्ग किंवा पार्किंग व्यवस्था नेमून देणे, पुरेसे बॅरिकेट्स लावणे, पोलिस वाहनांवर लावण्यात आलेल्या ‘पब्लिक ॲड्रेस सिस्टीम’द्वारे सुचना देणे, दंड करणे अशा आवश्यक सर्व कार्यवाही करण्यासंदर्भात संबंधित पोलिस अधिका-यांना सुचना देण्याबाबत मनपा आयुक्तांनी पोलिस आयुक्तांना दिलेल्या पत्रामध्ये नमूद केले आहे.

जबाबदारीने वागा, सुरक्षित राहा

दिवाळीच्या सण हा आनंदाचा सण आहे. मात्र आपल्या बेजबाबदार वागणुकीमुळे तो जीवावर बेतू शकतो. दिवाळी निमित्त बाजारांमध्ये होणारी गर्दी अत्यंत धोकादायक आहे. ही गर्दी टाळण्यासाठी प्रशासनातर्फे कार्यवाही सुरू झाली आहे. मात्र नागरिक म्हणून आपण प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखणे गरजेचे आहे. देशातील काही भागांमध्ये कोरोनाची दुसरी लाट येत आहे. त्यामुळे आपणही सतर्क राहणे गरजेचे आहे. उत्सव साजरा करताना कुणालाही सुरक्षेचा विसर पडू नये. मास्क, सॅनिटाजर, हँडवॉश ही त्रिसूत्री आता नेहमी आपल्या सोबत असायलाच हवी. याशिवाय बाजारामध्ये दुकानदार, हॉकर्स यांनीही सामंजसपणाने व्यवसाय करणे आवश्यक आहे. प्रत्येकाने मास्क लावणे अनिवार्य आहे.

दुकानात येणा-या प्रत्येकाला मास्क लावायला सांगा, मास्क घातल्याशिवाय कुणालाही दुकानात येऊ देऊ नये, कुठल्याही प्रकारची गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्या, दुकानात क्षमतेपेक्षा जास्त लोकांना प्रवेश देऊ नये, शारीरिक अंतर राखले जाईल याची काळजी घ्या. कोरोनाच्या या संकटात आपणाला नियमांचे पालन करून एकत्रित लढा द्यायचा आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:ची काळजी घ्या, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

दीक्षाभूमी भूमिगत पार्किंगला स्थगिती

नागपूर :- दीक्षाभूमी येथे विकासाचा आराखडा तयार करण्यात आला. त्यासाठी राज्य सरकारने 200 कोटी रुपये …

पारडी येथील प्रस्तावित बाजारपेठेची मनपा आयुक्तांनी केली पाहणी

नागपूर – नागपूर महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी गुरुवारी (२७ जून) पारडी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved