
*शासकीय केंद्रावरून १२ व १४ एप्रिलला होणार फक्त ‘रॅपिड अँटीजेन टेस्ट’*
*तांत्रिक अडचणीमुळे निर्णय : आवश्यकता भासल्यास आरटीपीसीआरची व्यवस्था*
*नागपूर, दि.११ :* कोव्हिड रुग्णसंख्या वाढल्यामुळे आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल मिळण्यास उशीर होत आहे. हा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आणि काही तांत्रिक अडचणीमुळे या सोमवारी 12 एप्रिल आणि बुधवारी 14 एप्रिल रोजी सर्व शासकीय चाचणी केंद्रावरून केवळ ‘रॅपिड अँटीजेन टेस्ट’ करण्यात येणार आहे.तसेच 13 एप्रिल ला गुढी पाडवाच्या निमित्त चाचणी केंद्र बंद राहतील.
कोव्हिड चाचणी केल्यानंतर तातडीने अहवाल प्राप्त झाल्यास पॉझिटिव्ह रुग्णांना पुढील उपचार घेणे सोयीचे होते. मात्र सध्या चाचण्यांची संख्या वाढल्याने परीक्षण करणाऱ्या मेडिकल, मेयो, एम्स, आरटीएमएनयू येथील प्रयोगशाळांवरील भार वाढला आहे. त्यामुळे चाचणी अहवाल प्राप्त होण्यास दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागत आहे. त्यामुळे या प्रयोगशाळांकडे असलेला बॅकलॉग भरून काढण्यासाठी आणि नव्या संभाव्य रुग्णांपासून होणारा संसर्ग टाळण्यासाठी सोमवार १२ एप्रिल व बुधवार १४ एप्रिल रोजी सर्व ४२ शासकीय चाचणी केंद्रावरून केवळ ‘रॅपिड अँटीजेन टेस्ट’ करण्यात येईल, अशी माहिती मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिली.
या चाचणीचा लेखी अहवाल रुग्णांना त्याच केंद्रावरून उपलब्ध होऊ शकेल. ज्यांना लक्षणे आहेत मात्र रॅपिड अँटीजेन टेस्ट मध्ये ते निगेटिव्ह आले असतील अशा व्यक्तीच्या आरटीपीसीआर चाचणीची विशेष व्यवस्था करण्यात येईल. अँटीजेन टेस्टचे प्राप्त अहवाल त्याच वेळी आयसीएमआर पोर्टलवर अपलोड करण्याचे निर्देशही मनपा आयुक्तांनी संबंधित कर्मचाऱ्यांना दिले आहेत.