
प्रतिनिधी नागपूर
नागपूर, ता. ८ : बंदी असलेल्या पीओपी मूर्तींच्या विक्रीसंदर्भात नागपूर महानगरपालिकेद्वारे संपूर्ण शहरात धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. महापौर दयाशंकर तिवारी यांच्या निर्देशानुसार व मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी जारी केलेल्या आदेशानुसार सुरू असलेल्या कारवाई अंतर्गत बुधवारी (ता.८) दहाही झोनमध्ये कारवाई करण्यात आली. याअंतर्गत शहरातील १८५ पीओपी मूर्ती जप्त करण्यात आल्या व मूर्ती विक्रेत्यांकडून दोन लाख २ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
पीओपी मूर्तीसंदर्भात सुरू असलेल्या कारवाईमध्ये उपद्रव शोध पथकाद्वारे बुधवारी (ता.८) शहरातील लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली, नेहरूनगर, गांधीबाग, सतरंजीपुरा, लकडगंज, आशीनगर आणि मंगळवारी या दहाही झोनमधील २५० दुकानांची तपासणी करण्यात आली त्यातील १८५ पीओपी मूर्ती जप्त करण्यात आल्या. सर्वाधिक ५० हजार रुपये दंड गांधीबाग झोन अंतर्गत वसूल करण्यात आला. झोनमधील ४४ दुकानांची तपासणी करून ३५ पीओपी मूर्ती जप्त करण्यात आल्या.
झोननिहाय कारवाई
झोन दुकाने तपासली मूर्ती जप्त दंड वसूल
१. लक्ष्मीनगर २० २० ११ हजार
२. धरमपेठ २० २७ ११ हजार
३. हनुमाननगर २५ १० २८ हजार
४. धंतोली ४२ ४ २० हजार
५. नेहरूनगर ४२ १० २१ हजार
६. गांधीबाग ४४ ३५ ५० हजार
७. सतरंजीपुरा १५ ०९ १५ हजार
८. लकडगंज २६ ६५ २५ हजार
९. आशीनगर ०६ ० ६ हजार
१०. मंगळवारी १० ५ १५ हजार
—————————————————————————-
एकूण २५० १८५ २,०२,०००/-
या संपूर्ण कारवाईचे नेतृत्व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे नोडल अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले व उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांनी केले. झोन पथकाने कारवाईमध्ये जप्त केलेल्या पीओपी गणेश मूर्ती संबंधित झोनच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केल्या.
याशिवाय नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता.८) कोव्हिड नियमांतर्गत उल्लंघन केलेल्या दोन दुकान/प्रतिष्ठानावर कारवाई करुन १० हजार रुपयांचा दंड वसूल केला. पथकाने ३८ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.