
नागपूर ता. ९ : भारतीय संविधानानुसार १८ वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक नागरिकाचा ‘मताधिकार’ कायदेशीर अधिकार आहे. परंतु, मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सर्वप्रथम मतदार यादीत नाव नोंदविणे आवश्यक आहे. मतदार नोंदणीपासून एकही नागरिक वंचित राहू नये, यासाठी मुख्य निवडणूक आयोगाकडून १ ते ३० नोव्हेंबर २०२१ दरम्यान मतदार नोंदणीसाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्य निवडणूक आयोगामार्फत जारी आदेशानुसार नागपूर शहरातील १ जानेवारी २०२२ रोजी १८ वर्षे पूर्ण होत असलेल्या सर्व नवमतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदार यादीत आपले नाव नोंदवा, असे आवाहन मनपा तर्फे करण्यात आले आहे.
लोकशाही व्यवस्थेत सहभागी होण्याची पहिली पायरी म्हणजे मतदार नोंदणी होय. म्हणूनच १८ वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक नागरिकांनी मतदार यादीत नाव नोदनवून लोकशाही व्यवस्थेत सहभागी व्हावे. तसेच मतदार यादीत आधीच नाव समाविष्ट असलेल्या मतदारांना नावात, पात्त्यात किंवा इतर काही दुरुस्ती करावयाची असल्यास त्यासाठीसुद्धा अर्ज करावा असे, आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.
नाव नोंदणी करताना अर्जदाराचे वय २१ वर्षापेक्षा जास्त असेल तर अर्जदाराने सादर केलेले वयाचे प्रतिज्ञापत्र (जोडपत्र तीन) वयाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरल्या जातो. वयाचा पुरावा म्हणून अन्य कोणत्याही पुरावा मागितला जात नाही. मात्र १८ ते २१ वर्षे वय असणाऱ्यांसाठी जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, जन्मतारखेची नोंद असलेली पाचवी/आठवी/दहावी/बारावी यापैकी एका इयत्तेची गुणपत्रिका, पॅन कार्ड, वाहन चालक परवाना, भारतीय पासपोर्ट, आधार कार्ड यापैकी एका दस्तावेजाची आवश्यकता असेल. याशिवाय एखाद्या व्यक्तीकडे वरीलपैकी कोणतेही दस्तऐवज नसतील तर त्या व्यक्तीच्या पालकाचे लेखी प्रतिज्ञापत्र तर तृतीय पंथींच्या गुरूंनी भरून दिलेलं अर्ज क्रमांक ६ मधील जोडपत्र सुद्धा ग्राह्य धरल्या जातो. हे दोन्ही पर्याय शक्य नसल्यास अर्जदार महानगरपालिकेच्या समिती सदस्यांकडून वयाबाबत प्रमाणपत्र घेऊ शकतात, अशी माहिती मुख्य निवडणूक आयोगाच्या पत्रकात दिली आहे.
ऑनलाईन/ऑफलाईन नाव नोंदणी
– National Voter Service Portal (www.nvsp.in)
– Voter Portal Beta (https://voterportal.eci.gov.in/) किंवा
– Voter Helpline App (VHA) मोबाईल अँप
– किंवा संबंधित मतदार नोंदणी कार्यालयात जाऊन ऑफलाईन नोंदणी करता येईल.
वंचित घटकांच्या नाव नोंदीसाठी विशेष प्रयत्न
या विशेष कार्यक्रमातून वंचित घटकांच्या नाव नोंदीसाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. बेघर किंवा पदपथावर राहणाऱ्या व्यक्ती, देह व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया आणि तृतीयपंथी हे आवश्यक कागदपत्रांच्या कमतरतेमुळे मतदार यादीत नाव नोंदवू शकत नाही. अशांसाठी भारतीय निवडणूक आयोगाने कागदपत्रांची विशेष सवलत दिली आहे. अशा व्यक्तींसाठी कार्य करणाऱ्या सामाजिक संस्था आणि संघटनांनी पुढाकार घेऊन त्यांचे मतदार यादीत नाव नोंदवावे, असेही आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.
नाव नोंदणी करताना आवश्यक कागदपत्रे :
मतदार म्हणून नाव नोंदणी करू इच्छिणाऱ्या नागरिकाने अर्ज क्रमांक ६ भरणे आवश्यक आहे.
१. अर्जदार भारताचा नागरिक असावा
२. स्वतःचे छायाचित्र (पासपोर्ट साईज फोटो)
३. इतर कोणत्याही मतदार यादीत नाव नाही याविषयीचे प्रतिज्ञापत्र, जे अर्ज क्रमांक ६ मध्ये अंतर्भूत असते.
४. वयाचा दाखला
५. निवासाचा पुरावा
नाव नोंदणीनंतर पत्ता बदलल्यास काय करावं?
१. नवीन पत्ता आधीच्याच मतदारसंघातील असेल, तर अर्ज क्र. ८अ बघून नवीन पात्याची नोंद करावी.
२. नवीन पत्ता अन्य मतदारसंघातील असल्यास जुन्या मतदारसंघातील नाव वगळण्यासाठी अर्ज क्र. ७ भरावा. त्यानंतर नवीन मतदारसंघात नाव नोंदणी करण्यासाठी अर्ज क्र. ६ भरावा.
निवासाचा पुरावा
अर्जदाराला नाव नोंदणीसाठी पुढीलपैकी एका पुराव्याची आवशकता आहे.
१. बँक/किसान/टपाल यांचे चालू पासबुक, २) रेशनकार्ड ३) भारतीय पासपोर्ट ४) वाहन चालक परवाना, ५) अलीकडील भाडेकरार, ६) पाणी/टेलिफोन/वीज/गॅस यांचे अलीकडचे बिल, ७) इन्कम टॅक्स असेसमेंट ऑर्डर
दिव्यांग मतदारांसाठी
भारतीय निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदारांसाठी खास PWD या अँपची सोय केलेली आहे. यावरून दिव्यांग मतदारांना नाव नोंदणी करता येईल. तसेच त्यांनी आधी नोंदणी केली असेल, पण दिव्यंगत्व म्हणून नोंद केली नसेल तर अशा व्यक्तींनाही या अँपवरून त्यांचे दिव्यंगत्व चिन्हांकित करता येतो.