
अवैध (वाळू) रेतीसाठा चोरीला गेला तरी कशा?
अवैध जप्त केलेल्या रेती साठ्याची चोरी – गुन्हा दाखल करण्याची नागरीकांची मागणी
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर-चिमूर तालुक्यातील नेरी व परिसरात मोठ्या प्रमाणात रेतीतस्करी होत आहे. अनेकवेळा कारवाई होऊन देखिल रेतीतस्कर न जुमानता सर्रास रेतीतस्करी करीत असल्याचे पहावयास मिळत आहे. रेतीतस्करीचा हा खेळ अंधाराच्या काळोखाचा फायदा घेत चालत असून दिवसाढवळ्या देखील तस्करी सुरू असतांना मात्र प्रशासन हे डोळे लावुन गप्प असल्याचे पहावयास मिळत आहे. नेरी परिसरातील अवैध रेतीतस्करी ही भर दिवसा चालत असून रेतीतस्करी करणारी वाहने भरधाव वेगाने चालत असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे. तसेच शासनाला लाखो रुपयांचा चुना लागत आहे.
दि. 29/09/2021 ला शेंदरे लेआऊट मधील जनता प्राथमिक विद्यालयातच्या सामोरील रिकाम्या जागेतील 10 मीटर लांब, 4.5 मी. रुंदी, 0.7 मी. उंची असा एकूण 31.05 मीटर असलेला 11 ब्रास अवैधरित्या साठविलेला रेतीचा पंचनामा करून जप्त करण्यात आला होता. ही कारवाई नेरी येथील तलाठी सी. पी. ठाकरे व सिरपूर येथील तलाठी निखाडे यांनी नागरिकांसमक्ष केली होती. मात्र 1 महिन्याचा काळ ओलांडताच तब्बल 11 ब्रास रेतीचा ढिगाराच चोरीला गेलेला असल्याने प्रशासनावर नागरिकांनी शंका व्यक्त केली आहे. जर जप्त साठाच चोरीला जात असेल तर मग अवैधरित्या किती रेती चोरीला जात असेल ? असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे.
या पूर्वी विविध ठिकाणी रेती तस्करी करणारी वाहने जप्त करून लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेले असतानाही मात्र रेती तस्कर रेती चोरी थांबवित नसल्याने प्रशासनाने याबाबीकडे विशेष लक्ष देऊन अवैधरित्या तस्करी करणाऱ्यांच्या मूसक्या आवळाव्या व तस्करांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी नागरीकांनी केलेली आहे.