
‘
नागपूर, दि. 18 : जिल्ह्यात 30 नोव्हेंबरपर्यंत हर घर दस्तक ही कोविड-19 लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत गावनिहाय पहिला डोस व दुसरा डोस अद्याप न घेतलेल्या 18 वर्षावरील व्यक्तीच्या घरी भेट देवून त्यांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. ग्रामीण भागात या मोहिमेंतर्गत आतापर्यंत 91 हजार 497 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे. या मोहिमेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन कोविड लसीकरणास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी विमला आर., मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुभेजकर यांनी सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, मुख्याधिकारी यांच्याकडून मोहिमेबाबत आढावा घेवून सूचना केल्या आहेत. जिल्ह्यासाठी पुरेशा प्रमाणात कोविड लस उपलब्ध असून 30 नोव्हेंबर पर्यंत शंभर टक्के पहिला डोस पूर्ण करण्याच्या निर्देश त्यांनी दिले.
मोहिमेदरम्यान गावपातळीवर शिक्षक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी कार्यकर्ता, ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य सेवक, सेविका यांच्यामार्फत घरोघरी जावून नागरिकांना डोस पूर्ण करण्याबाबत समुपदेशन करणार आहेत. शिक्षण, ग्रामविकास, महिला व बाल कल्याण विभाग, जिल्हा ग्रामविकास यंत्रणा, महसूल विभाग यांना एकत्रितरित्या समन्वयाने लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मोहिमेदरम्यान गावनिहाय कमी लसीकरण झालेल्या गावांची यादी करुन प्राधान्याने त्या गावात लसीकरणाचे शिबीर घेण्यात येणार आहे. कोविड लसीकरणाची टक्केवारी जास्तीत जास्त करण्यावर भर देण्यात येणार आहे.
या मोहिमेंतर्गत पहिला डोस घेणारे लाभार्थी 35 हजार 60 असून दुसरा डोस घेणारे लाभार्थी 56 हजार 437 आहेत. तालुकानिहाय आकडेवारी या प्रमाणे आहे. भिवापूर-3 हजार 120,हिंगणा-10 हजार 831, कळमेश्वर-6 हजार 236, कामठी- 13 हजार 999, काटोल-6 हजार 15, कुही-4 हजार 530, मौदा-3 हजार 734, नागपूर- 10 हजार 197, नरखेड-5 हजार 129, पारशिवनी-5 हजार 149, रामटेक-4 हजार 659, सावनेर 10 हजार 543 व उमरेड-7 हजार 355 अशी आहे.